संतोष मासोळे

धुळे

राजवाडे वस्तुसंग्रहालय व संशोधन मंडळ, समर्थ वाग्देवता मंदिर, गांधी तत्त्वज्ञान केंद्र या जगप्रसिद्ध संस्थांचे अस्तित्व लाभलेला धुळे जिल्हा क्षेत्रफळाने लहान आहे. प्राचीन काळी कृषक म्हणून ओळखला जाणारा खान्देशातील हा प्रदेश आज दुष्काळाच्या छायेत मोडतो. त्यामुळे पावसाचे पाणी अडवून शेतीसाठी ते उपयोगात आणण्याची धडपड कायम होत असून त्यात बऱ्यापैकी यशही येत आहे.

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Election campaigning was stopped due to rain
प्रचार पाण्यात! पावसाची रिपरिप प्रचाराच्या मुळावार, उमेदवार घरातच
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

अडीच दशकांपूर्वी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती झाली. आता जिल्ह्यात धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा या चार तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात तापी, पांझरा, बुराई, अरुणावती, अनेर, बोरी, कान आणि आरु या महत्त्वाच्या नद्या आहेत. भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात २१व्या तर लोकसंख्येच्या दृष्टीने २३ व्या क्रमांकावर हा जिल्हा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या २० लाख ५० हजार इतकी आहे. बहुसंख्य म्हणजे ७३ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. साक्षरतेचे प्रमाण ७२ टक्क्यांहून अधिक आहे.

पावसाचे पाणी अडविण्यासाठी शिरपूर, शिंदखेडा आणि धुळे या तालुक्यांत झालेले अथक प्रयत्न देशात लक्षवेधी ठरले. विशेषत: तापी नदीच्या काठावर असलेल्या शिरपूर तालुक्यातील बहुतेक गावांत टंचाई होती. ही टंचाई ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून कायमची दूर करण्यात आली. पाणी अडविण्याच्या शिरपूर पद्धतीने जल व्यवस्थापनाची वेगळी दिशा अधोरेखित केली. शिंदखेडा आणि धुळे तालुक्यांतही सिंचनासाठी नदी, नाल्यांवर पाणी अडविण्याचे प्रयत्न झाले आहेत. याद्वारे टंचाईतून मुक्तता मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा प्रशासन आणि राजकीय नेते यांच्या संयुक्त इच्छाशक्तीचे हे प्रारूप आहे. जिल्ह्यात १२ मध्यम प्रकल्प असून त्यांचे लाभक्षेत्र ८६ हजार चार हेक्टर आहे. जवळपास ३७,३१६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. त्यामुळे कधीकाळी पाण्यासाठी दाहीदिशा होणारी भटकंती कमी होण्यास हातभार लागत आहे.

मानव विकास निर्देशांकात २००१ ते २०११ या दशकात अल्प  सुधारणा झाली. यात सेवा क्षेत्र, उद्योग व शेतीचे योगदान मोठे आहे. मात्र, पायाभूत सुविधांची उणीव सामाजिक विकासात अवरोध ठरली. दरडोई जिल्हा उत्पन्न एक लाख ३६ हजार ४५९ इतके असून राज्याच्या तुलनेत ते बरेच कमी आहे. 

जिल्ह्यात खासगी अनुदानित एक हजार ४०३ प्राथमिक शाळा असून यातील ३८ शाळा मुलींसाठी आहेत, तर २०६ माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी १४ शाळा मुलींसाठीच्या आहेत. शैक्षणिक सर्वेक्षणात आकलन क्षमता आणि वाचन कौशल्य यात स्थानिक विद्यार्थ्यांची कामगिरी जवळपास राज्याच्या सरासरीच्या तुलनेइतकी आहे. शालेय शिक्षणात गळतीचे प्रमाण ५.६ टक्के आहे.

जिल्ह्यात १३ रुग्णालये, २६ दवाखाने, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र, २३८ आरोग्य उपकेंद्राद्वारे तळागाळापर्यंत आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न होत आहे. शिरपूर व धुळे येथे प्रत्येकी चार तर शिंदखेडा व साक्री येथे अनुक्रमे दोन आणि तीन या संख्येने रुग्णालये आहेत.

शेती, पशुपालनावर परिणाम

कायम दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री हे दोन तालुके वगळता शिंदखेडा आणि धुळे या दोन तालुक्यांतील बहुतेक भाग कोरडवाहू आहे. दुष्काळसदृश स्थितीमुळे आजही काही भागात दरवर्षी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उदभवतो. यामुळे दुभत्या जनावरांची विक्री वाढते. बहुतेक पशुपालकांना दुभती जनावरे विकावी लागतात. त्यामुळे पशुपालकांची संख्याही कमी झाली आहे.

औद्योगिक मागासलेपण

पुरेशा सोयी सुविधा नसल्याने औद्योगिकदृष्टय़ा विकासात धुळे जिल्हा मागासलेला आहे. शिरपूर तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. स्थानिक पातळीवर कापड गिरणी, सूत गिरणी, यंत्रमाग, तेल गिरण्या, रसायन उद्योग, सिमेंट पाईप, सॉ मिल, असे उद्योग आहेत. जिल्ह्यात चार रासायनिक प्रकल्प आहेत. नरडाणा औद्योगिक वसाहतीमध्ये दोन मोठे सिमेंट उद्योग आहेत. या शिवाय बेदमुथा वायरचा उद्योग आहे. जिल्ह्यात नोंदणी झालेल्या २७८ पैकी सहा कारखाने बंद आहेत.

दळणवळण सुविधा समाधानकारक

जिल्ह्यात सात हजार १११ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, सूरत-नागपूर महामार्ग जिल्ह्यातून जातो. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण प्रगतिपथावर आहे. मध्य व पश्चिम रेल्वेचा मार्ग या जिल्ह्यातून जातो. पण ते दोन्ही मार्ग एकेरी आहेत. जिल्ह्यातील सर्व गावे बारमाही रस्त्याने जोडलेली आहेत. गोंदूर व शिरपूर येथे विमानासाठी धावपट्टीची सोय आहे. दळणवळण सुविधा समाधानकारक असली तरी मार्गाचा विस्तार, रेल्वे वाहतुकीला चालना, उपलब्ध पाणीसाठय़ाचा सुयोग्य वापर करण्यासाठी वितरण व्यवस्थापनात सुसूत्रता आणि मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.