आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावात मुलाच्या वडिलांना दोरखंड बांधून गावातून अक्षरशः धिंड काढली आणि झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण झाली. याप्रकरणी मुलीकडच्या १२ जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेतील मुलाचे वडील दामाजी बरकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीच्या कुटुंबीयांतील रघुनाथ महादेव कांबळे, उत्तम महादेव कांबळे, महादेव निवृत्ती कांबळे, नामदेव निवृत्ती कांबळे, मलकि-या जालिंदर कांबळे, हणमंत कांबळे, परमेश्वर गोरख कांबळे, धनाजी जालिंदर कांबळे व आबा नामदेव कांबळे या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय एका महिलेसह अन्य तीन संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाळवणीत बरकडे यांच्या मुलाचे कांबळे कुटुंबीयांतील मुलीबरोबर प्रेम होते. दोघांनी ४ आॕगस्ट रोजी घरातून पळून जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केला आणि हे नवदाम्पत्य स्वतःहून मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या मंडळींनी पोलिसांसमोर एकत्र येऊन वादावर पडदा टाकला होता. तरीही जोखीम नको म्हणून नवदाम्पत्याला गावातील एका नातेवाईकाच्या घरी ठेवण्यात आले होते. त्यानंतर हे नवदाम्पत्य नोकरीसाठी पुण्याला निघून गेले आणि वादाला तोंड फुटले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या वडिलांनी मुलीकडील थोरल्या जावयाला फोन करून आपल्या मुलाकडे लक्ष देण्याची विनंती केली. या गोष्टीचा राग मनात बाळगून मुलीच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांच्या वस्तीवर जाऊन, तू आमच्या थोरल्या जावयाला फोन का केला? असा जाब विचारत त्यांना मारहाण केली.  त्यानंतर मुलीकडील कुटुंबीयांनी मुलाच्या वडिलांच्या हातांना काढण्या बांधून  त्यांची अक्षरशः धिंड काढली. गावातील मुख्य चौकात ‘धिंड’ आल्यानंतर त्यांना लिंबाच्या झाडाला दोरखंडाने बांधून गावक-यांच्या देखत पुन्हा अमानुषपणे मारहाण करण्यात आली. शेवटी काही गावक-यांनी हस्तक्षेप केला आणि पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीसही धावून आले. सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी भाळवणी गावास भेट देऊन प्रकरणाच्या तपासाची माहिती घेतली.

बरकडे कुटुंबीय दहशतीखाली-
आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या मुलाचा थोरला भाऊ लष्करात असून देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहे. त्याची पत्नी व तान्हे बाळ घरीच आहे. हे कुटुंबीय दहशतीखाली आहे. माझा मुलगा सीमेवर देशाचे रक्षण करतोय. आमचे रक्षण पोलिसांनी करावे, अशी मागणी मुलाच्या आईने केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकरांची भेट –
दरम्यान, धनगर समाजाचे नेते, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंगळवेढा तालुक्यात भाळवणी येथे जाऊन अमानुषपणे मारहाण झालेल्या दामाजी बरकडे यांची भेट घेतली. आंतरजातीय प्रेमविवाहातून घडलेला मारहाणीचा हा प्रकार धक्कादायक आहे. पोलिसांनी संबंधित हल्लेखोरांना अटक करून कारवाई केली असल्याचे सांगत. गावात आणखी जातीयतेढ वाढणार नाही, याची सर्वांनीच दक्षता घ्यायला हवी, अशी अपेक्षा आमदार पडळकर यांनी व्यक्त केली.