अनिश पाटील, लोकसत्ता

मुंबई: त्रिपुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी घडलेल्या हिंसक घटना या पूर्वनियोजित असल्याचा कोणताही पुरावा अद्याप सापडला नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्रिपुरा येथील घटनेचा नागरीकांनी एकत्र येऊन १११  ठिकाणी निषेध केला होता. विविध सरकारी अधिकारी, कार्यालयांना  निवेदने देण्यात आली होती.

त्रिपुरामधील घटनेचा निषेध करण्यासाठी गेल्या शु्क्रवारी  राज्यात १११ पेक्षा जास्त ठिकाणी  नागरिक जमले. पोलिसांच्या तपासणीत राज्यभरात अशी १११ निवेदने देण्यात आली. त्यातील ४५ निवेदने रझा अकादमीच्या माध्यमातून, उर्वरीत ७० निवेदने इतर संघटनांनी दिली.  राज्यभरात एकूण २३ संघटनाच्या वतीने ही निवेदन सादर करण्यात आली. अमरावती, नांदेड व मालेगाव या तीन ठिकाणीच हिंसक पडसाद उमटले.

हिंसाचार पूर्वनियोजीत असता, तर फक्त तीन ठिकाणीच त्याचे पडसाद उमटले नसते. याशिवाय या अमरावतीत सुमारे  १० हजार नागरिक जमले होते. पण त्यातील केवळ ७० ते १०० नागरिकच हिंसक घटनांमध्ये सहभागी झाले होते. घटनास्थळी चाकू, सुऱ्या यासारखी कोणतीही शस्त्रे सापडली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सध्यातरी या घटना पूर्व नियोजीत असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

पूर्वनियोजीत हिंसक घटनांमध्ये काचेच्या बाटल्या, हत्यारे, मिरची पूड अशा वस्तूंचा वापर होतो. तसे काहीही वापरण्यात आले नाही. तसेच हिंसक घटनेत सामील झालेली तरूण मुले होती. त्याशिवाय ज्या रझा अकादमीवर याप्रकरणानंतर आरोप होत आहेत, त्यांनी सुरूवातीला फक्त मुंबईत निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. त्याचा प्रतिसाद पाहता राज्यात इतर ठिकाणीही निषेध करण्याचे स्थानिक पातळीवर ठरवण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.