scorecardresearch

अनिष्ट रूढींच्या विरोधात संघर्ष ; सोलापुरात सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार

एवढेच नव्हे तर राज्यातील काही भागात चारशेहून अधिक तरुण विधवा महिलांनी पुनर्विवाह करण्याची इच्छा बोलून दाखविली आहे.

एजाज हुसेन मुजावर, लोकसत्ता

सोलापूर :  पतीच्या मृत्यूनंतर महिलांना अनेक अनिष्ट प्रथांना सामोरे जावे लागते. समाजाकडून होणारी अवहेलना आपल्या पत्नीच्या वाटेला येऊ नये म्हणून सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील पोथरे गावचे प्रमोद झिंजाडे यांनी पारंपरिक अनिष्ट रूढींच्या सर्व बंधनांतून पत्नीला मुक्त करण्याचे ठरविले आहे. आपल्या मृत्युपश्चात पत्नीवर अनिष्ट रूढी परंपरा लादू नये. तिचे कुंकू पुसू नये, मंगळसूत्र काढू नये, पायातील जोडवे काढू नयेत, हातातील बांगडय़ा फोडू नयेत म्हणून प्रतिज्ञापत्रच लिहिले आहे. याबाबतचे वृत्त  लोकसत्ता  मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर त्यापासून प्रेरणा घेत झिंजाडे यांच्याकडे शंभर पुरुषांनी त्यांचे अनुकरण करण्याचा मनोदय कळविला आहे.

एवढेच नव्हे तर राज्यातील काही भागात चारशेहून अधिक तरुण विधवा महिलांनी पुनर्विवाह करण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. झिंजाडे यांनीही या सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा निश्चय केला आहे.  महाराष्ट्र शासनाने विधवा महिला सन्मान कायदा तयार करून तो प्रभावीपणे कृतीत आणला पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. ६४ वर्षांचे प्रमोद झिंजाडे हे गेली चार दशके सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. त्यांच्या विवाहाला ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. सर्व अपत्ये उच्चशिक्षित असून त्यांचे विवाह झाले आहेत. झिंजाडे यांनी आपल्या मृत्युपश्चात पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसू नये म्हणून तहसीलदाराकडे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचे वृत्त लोकसत्ताह्णमध्ये प्रसारित होताच सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी झिंजाडे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे कौतुक केले. एवढेच नव्हे तर पोलीस मुख्यालयातील पोलीस कुटुंबीयांच्या महिलांसाठी हाती घेतलेल्या गारमेंट शिलाई प्रशिक्षण वर्गाच्या शुभारंभासाठी झिंजाडे यांना सन्मानाने आमंत्रित केले.

 पोलीस कुटुंबीय कल्याणकारी महिला बहुउद्देशीय स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून पोलीस कुटुंबीयांतील महिलांना  शिलाई प्रशिक्षण दिले जात आहे.  यानिमित्ताने संवाद साधताना प्रमोद झिंजाडे यांनी स्वत:च्या सामाजिक कार्याचा पट उलगडून दाखविताना विधवा महिलांचे प्रश्न मांडले.  करोना महामारीत हजारो व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. यापैकीच एका तरुणाच्या मृत्यूनंतर त्याची २२ वर्षांची तरुण विधवा भेटली. अनिष्ट प्रथा परंपरांच्या ओझ्याखाली विधवेचे आयुष्य जगताना तिचा सन्मानच हिरावून घेतला होता. बारावी परीक्षेत ९६ टक्के गुण मिळविलेल्या या तरुण विधवेची पुनर्विवाह करण्याची सुप्त इच्छा होती. परंतु तिच्यावर कुटुंबीयांसह नातेवाईक आणि एकूण समाजाचा दबाव होता. त्यातूनच आपण विधवा महिलांचा प्रश्न हातात घेतल्याचे झिंजाडे सांगतात. 

सध्याच्या एकविसाव्या शतकात अगदी शहराबाहेर डोकावून पाहिले तर विधवांची स्थिती किती दयनीय आहे, याचा प्रत्यय येतो.  विधवांना नव्याने आयुष्य सुरू करण्याची संधी खूप कमी मिळते. त्यांचा आवाजच दाबला जातो. म्हणून सामाजिकदृष्टय़ा अशा संवेदनशील प्रश्नावर काम करणाऱ्या प्रमोद झिंजाडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी हरीश बैजल यांच्यासारखे वरिष्ठ पोलीस अधिकारी उभे राहतात, ही बाब तेवढीच दिलासादायक म्हटली पाहिजे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Initiative of social workers in solapur against traditional harmful social norms for women zws

ताज्या बातम्या