जखमी आढळलेले खवल्या मांजर गायब

जखमी असल्याने या प्राण्याची हालचाल मंदावली होती.

कवठेमहांकाळ तालुक्यातील घटना

सांगली : वन विभागाच्या दुर्लक्षामुळे गिर्रिंलग डोंगराच्या पायथ्याला जखमी अवस्थेत आढळलेले दुर्मीळ खवल्या मांजर गायब झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला. गावकऱ्यांनी वेळीच माहिती देऊनही वन कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

याबाबत माहिती अशी, कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथील गिर्रिंलग डोंगराच्या पायथ्याला असलेल्या कारंडे वस्तीवर गुरुवारी रात्री एका पोल्ट्रीमध्ये खवल्या मांजर जखमी अवस्थेत आढळले होते. गावकऱ्यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत हा प्राणी प्रथमच पाहत असल्याचे सांगितले.

जखमी असल्याने या प्राण्याची हालचाल मंदावली होती. त्याला तत्काळ उपचाराचीही गरज होती. मात्र वन कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे सध्या वाहन नाही, उद्या सकाळी पुढील या प्राण्याबाबत निर्णय घेऊ असे सांगून काढता पाय घेतला.

दरम्यान, आज सकाळी पोल्ट्री शेडमधून हा प्राणी गायब झाल्याचे दिसून आले. स्थानिकामध्ये या प्राण्याची खवल्या मांजर अशी ओळख असून एखादे श्वान मागे लागल्याने त्यांने  पोल्ट्री शेडमध्ये आश्रय घेतला असावा असा कयास असला तरी या प्राण्याची तस्करीही केली जात असल्याचे सांगण्यात आले. अंगावरील खवल्यायुक्त त्वचेमुळे त्याचा वापर प्रामुख्याने शोभीवंत वस्तू तयार करण्यासाठी केला जात असल्याने तस्करीसाठी या प्राण्याचे अपहरण करण्यात आल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Injured scaly cat disappears akp