भरधाव वेगाने जाणारी इनोव्हा मोटार लिंबाच्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार व तिघे गंभीर जखमी झाले. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास संगमनेर-लोणी रस्त्यावर निमगावजाळी गावानजीक अपघात झाला. मृतांमध्ये बाभळेश्वर येथील श्रीरामपूर दूध जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक बापूसाहेब गाडे यांचा समावेश आहे.
श्रीरामपूर दूध जिल्हा संघ हा गुजरातमधील पंचमहल डेअरीने चालविण्यास घेतला असून, दूधधंद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी संघाचे संचालक मंडळ गुजरात येथे शनिवारी गेले होते. बैठक ओटपून संचालक वेगवेगळय़ा वाहनांतून परत येत असताना इनोव्हा मोटार भरधाव वेगात लिंबाच्या झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये गाडे (वय ५०, रा. बारागावनांदूर, ता. राहुरी) यांच्यासह गुजरातमधील पंचमहल डेअरीचे विशेष कार्यकारी अधिकारी मधुकर थोरात (वय ४४, रा. वडगावपान, ता. संगमनेर) व मोटारचालक विशाल विलास सगळगिळे (वय २८ रा. टाकळीमियाँ, ता.राहुरी) हे तिघे  जागीच ठार झाले. दूध संघाचे संचालक बाळासाहेब सगाची काळे, जनार्दन दत्तात्रय घुगरकर, मधुकर लोंढे हे तिघे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी जखमींना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.