एजाजहुसेन मुजावर

कथित खोट्या आणि बनावट जातीच्या दाखल्याप्रकरणी सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना पोलीस तपास यंत्रणेसमोर तपासाकामी आठवड्यातून दोनवेळा हजेरी द्यावी लागत आहे. शहर गुन्हे शाखेत बोलावून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली जात असल्यामुळे खासदार हे पुरते वैतागले आहेत. स्वत:चे अध्यात्म क्षेत्र, मठ हेच बरे होते. राजकारणात येऊन डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली आहे, अशी व्यक्त केलेली खंत पुरेशी बोलकी ठरते.

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करून निवडून आले होते. परंतु ही निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी सादर केलेला ‘बेडा जंगम’ नावाचा अनुसूचित जातीचा दाखला वादग्रस्त ठरला आहे. सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला यापूर्वीच अवैध ठरविला आहे. त्यावर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेले अपील प्रलंबित आहे. दरम्यान, तत्पूर्वी जातीचा दाखला खोटा आणि बनावट असल्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अक्कलकोटच्या तहसीलदारांना संबंधित व्यक्तींची चौकशी करून न्यायालयात फिर्याद देण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार अक्कलकोटचे तत्कालीन प्रभारी तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी सोलापूरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे फिर्याद दिली असता फौजदारी दंड संहिता कलम १५६(३) प्रमाणे सदर बझार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. बनावट कागदपत्रे तयार करणे, त्यांचा वापर करून फसवणूक करणे आदी आरोपाखाली खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यासह अक्कलकोट व उमरगा (जि. उस्मानाबाद) येथील तहसील कार्यालयातील तत्कालीन संबंधित दोन अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर  शिवाचार्य यांना त्यांचा मूळ जातीचा दाखला सादर करण्यास सांगितले होते. तथापि, त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी शिवसिद्ध विठ्ठल बुळ्ळा (वय ५२, रा. तडवळ, ता. अक्कलकोट) या व्यक्तीने, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी दिलेला त्यांचा जातीचा दाखला सोलापुरात वकिलाकडे सुपूर्द करण्यासाठी घेऊन येताना वाटेत गहाळ झाल्याची फिर्याद वळसंग पोलीस ठाण्यात नोंदविली होती. इकडे शहर गुन्हे शाखेकडून तपास होत असताना शिवसिद्ध बुळ्ळा यांच्याविषयी संशय बळावल्यामुळे त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. यात धक्कादायक माहिती समोर आली. घरझडतीत अनेक बनावट कागदपत्रे सापडली. यात अक्कलकोट तालुका दंडाधिकारी कार्यालयातील बनावट रबरी शिक्के, शाळा सोडल्याचे कोरे दाखले, अन्य काही व्यक्तींचे लिंगडेर जातीचे पडताळणी दाखले सापडले. त्यामुळे या गुन्ह््यात बुळ्ळा यांचा सहभाग दिसून आल्यामुळे ९ फेब्रुवारी रोजी त्यांना अटक करण्यात आली होती.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जातीचे प्रमाणपत्र त्यांच्याच सांगण्यावरून तयार केल्याची स्पष्ट कबुली बुळ्ळा यांनी तपासात दिली आहे. तपासामध्ये आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या असून यात डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या निकटच्या नातेवाईकांचे जातीचे दाखले लिंगायत जातीचे असल्याचे दिसून आले. काही व्यक्तींनी तर आपण कोणतीही कागदपत्रे न देतासुद्धा बुळ्ळा यांच्याकडून जातीची प्रमाणपत्रे मिळाल्याचा खुलासाही केला.