सावंतवाडी – कोकणच्या आणि पर्यायाने देशाच्या पर्यटन क्षेत्रात एक क्रांती घडवून आणणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आला आहे. भारत आणि आशिया खंडातील पहिले ‘अंडरवॉटर (पाण्याखालील) संग्रहालय’ मालवण-वेंगुर्ले दरम्यानच्या निवती बेटाजवळ समुद्राच्या मध्यभागी आकारास येत असून, भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘Ex INS गुलदार’ या ऐतिहासिक प्रकल्पासाठी सागरतळाशी विराजमान झाली आहे. १९ मे रोजी या कृत्रिम प्रवाळ भिंती आणि पाणबुडी संग्रहालयाच्या पहिल्या भागाचा टप्पा यशस्वीरीत्या संपन्न झाला. हा प्रकल्प देश-विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांचा पुढाकार:

नौदलात सलग चार दशके शौर्यशाली सेवा बजावल्यानंतर, १२ जानेवारी २०२४ रोजी ‘INS गुलदार’ या युद्धनौकेचा औपचारिक सेवानिवृत्ती सोहळा पार पडला. या नौकेचे ऐतिहासिक महत्त्व आणि कोकणच्या पर्यटनाला गती देण्याची गरज ओळखून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ही नौका ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास’ (MTDC) विनामूल्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. फेब्रुवारी २०२५ मध्ये याचे औपचारिक हस्तांतरण झाल्यानंतर महामंडळाने या प्रकल्पाचे शिवधनुष्य उचलले.

असा पार पडला ऐतिहासिक प्रवास:

या भव्य प्रकल्पाची एकूण पाच टप्प्यांत आखणी करण्यात आली आहे:
पहिला टप्पा: नौदलाकडून युद्धनौकेचे MTDC कडे हस्तांतरण.
दुसरा टप्पा: इंजिन नसलेल्या या महाकाय नौकेला टग बोटींच्या सहाय्याने खेचून विजयदुर्गच्या किनारपट्टीवर सुरक्षित आणण्यात आले.
तिसरा टप्पा: पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी युद्धनौकेच्या पोटातील सर्व हानिकारक व रासायनिक घटकांची पूर्ण स्वच्छता करण्यात आली.
चौथा टप्पा: ही नौका निवती समुद्रात २० ते २२ मीटर खोल सागरतळाशी यशस्वीरीत्या प्रस्थापित करण्यात आली आहे.

स्कूबा डायव्हिंग आणि पाणबुडीची सफर:

साहसी जलप्रेमी, अभ्यासक आणि पर्यटकांना स्कूबा डायव्हिंग व विशेष पाणबुडीच्या सहाय्याने थेट समुद्राच्या तळाशी जाऊन या युद्धनौकेचा थरार अनुभवता येणार आहे. या युद्धनौकेच्या परिसरात कृत्रिम प्रवाळ , समुद्री गवत आणि रंगीबेरंगी माशांचे एक वेगळेच जैवविविधतेने नटलेले जग अनुभवता येईल.

स्थानिकांना रोजगार आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण:
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि मार्गदर्शनासाठी स्थानिक स्कूबा डायव्हर्सना ‘पॅडी’ (PADI) या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, ते वाटाडे म्हणून काम पाहतील. तसेच स्थानिक तरुणांसाठी ‘पॅडी’ संस्थेशी संलग्न ‘डाइव्ह मास्टर्स’ हे शैक्षणिक अभ्यासक्रमही येथे उपलब्ध होणार असल्याने रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील.

स्वयंपूर्ण सागरी परिसंस्था!

कृत्रिम प्रवाळभित्ती निर्माण केल्यावर साधारण एका वर्षाच्या आत तिथे नैसर्गिक जलचर, स्पंज आणि वनस्पती वाढतात. यामुळे केवळ पर्यटनच वाढणार नाही, तर सागरी जैवविविधतेचे रक्षण होऊन भारतीय नौदलाच्या शौर्याचा वारसा पुढील अनेक शतके जिवंत राहणार आहे.
शेकडो हात आणि हजारो तासांच्या अथक परिश्रमांतून साकारणारा हा आशियातील पहिला अंडरवॉटर प्रकल्प सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीचा चेहरामोहरा बदलून टाकणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.