महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे. परंतु मतांचा जोगवा मागण्यासाठी भारतीय जनता पक्षाने टीव्हीच्या जाहिरातीतून माफियांचे राज्य म्हणून राज्याची बेअब्रू केली. इथल्या तमाम जनतेचा अपमान केला. अशा लोकांना मतदान न करता राज्याच्या हिताची जपणूक करणाऱ्या व केंद्रावर अंकुश ठेवण्याची धमक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
कंधार येथे उमेदवार शंकरअण्णा धोंडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. मोदी यांनी आपणावर, शेतकऱ्यांसाठी काही केले नाही, अशी टीका केली. परंतु सध्याच्या सरकारचे धोरण शेतकरीविरोधी आहे. साखर-सोयाबीन यांच्या निर्यातीवरील अनुदान घटविले. पंतप्रधान तालुकावार सभा घेत आहेत. यापूर्वी असे कधी झाले नाही. शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज आम्ही माफ केले. पीककर्ज व्याजदर १२ टक्क्य़ांहून शून्य केला. तीन लाखांपर्यंत मर्यादा वाढविली. त्याला ३ टक्के व्याजदर दिला. जगात कुठेच नसेल अशी गोरगरिबांसाठी अन्न सुरक्षा योजना अमलात आणली. परंतु पंतप्रधानांची भूमिका शेतकरी-शेतमजूर, दलित-मागास-अल्पसंख्याक यांच्या बाजूची नाही, असा आरोप पवार यांनी केला. टीव्हीच्या जाहिरातीत भाजपने माफिया असा उल्लेख करीत जनतेची बेअब्रू केली. त्यामुळे त्या पक्षाला तुम्ही मत देणार काय, असा सवाल करीत सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या राष्ट्रवादीला बहुमत द्या. शंकरअण्णा यांना पुन्हा आमदार करा, असे आवाहन पवार यांनी केले. धोंडगे यांनी ५ वर्षांत २३० रस्ते, ७० प्रकल्प पूर्ण केले, ६०० पांदण रस्ते तसेच १ हजार १७४ विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सांगितले. ४० वर्षांच्या सत्तेच्या काळात भाई धोंडगे यांनी काहीच कामे केली नाहीत. गुराखी गडाच्या टेकडीवर विमानतळ करण्याची मागणी केली. पक्ष बदलणाऱ्या प्रताप पाटील चिखलीकरांवरही टीका केली.
भाई धोंडगे अन् विमानतळ!
भाई केशवराव धोंडगे हे अभ्यासू. त्यांनी या भागासाठी कधीच काही मागितले नाही. गुराख्यांचे साहित्य संमेलन होते. त्या गडावर विमानतळ करा, अशी ते मागणी करीत. लातूर-नांदेडला विमानतळ नाही. मग गुराखीगडावर रोज विमान कसे येईल? तेथे विमानतळाची गरज काय, असे मी सांगायचो. पण ते ऐकत नव्हते. त्यांनी आयुष्यभर तत्त्वाचे राजकारण केले. पण उतरत्या वयात त्यांचा मुलगा भाजपत गेला, हे काही बरोबर नाही, अशी टिप्पणीही पवार यांनी केली.