चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाची आज तपासणी

तब्बल २४ त्रुटी काढून नामंजूरची शिफारस करणारी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची समिती एप्रिलमध्ये पुन्हा चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करणार आहे.

तब्बल २४ त्रुटी काढून नामंजूरची शिफारस करणारी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची समिती एप्रिलमध्ये पुन्हा चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करणार आहे. यावेळी कुठल्याही त्रुटी निघू नयेत म्हणून आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव सुजाता शौनिक उद्या, ११ मार्चला महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी करणार आहेत. या सर्व बाबींवर जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर स्वत: लक्ष ठेवून आहेत.
चंद्रपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी कॉंग्रेस आघाडी सरकारने मंजुरी दिली, परंतु निकषाप्रमाणे आवश्यक बाबींची पूर्तता केली नाही म्हणून २०१४-१५ या शैक्षणिक सत्रापासूनच सुरू होणारे वैद्यकीय महाविद्यालय रखडले. राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता येताच २०१५-१६ या सत्रापासून हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. यासाठी अर्थमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व शक्ती एकवटली आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेमार्फत त्रि- सदस्यीय समितीने २९ व ३० डिसेंबर २०१४ रोजी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेच्या अनुषंगाने भेट देऊन सखोल निरीक्षण केले होते. या समितीने २४ त्रुटी काढून महाविद्यालय नामंजुरीची शिफारस केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे केली होती. त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने प्रभारी अधिष्ठाता डॉ.दीक्षित यांनी १२ फेब्रुवारीला परिषदेने नमूद केलेल्या सर्व त्रुटींची परिपूर्तता करण्याबाबत सविस्तर अहवाल व युक्तीवाद सादर केला. या अहवालाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने समाधान व्यक्त केले होते.
आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव सुजाता शौनिक, शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या प्रस्तावित इमारतीची व अन्य बाबींची पाहणी करणार आहेत. त्यामुळे या परिपूर्तता अहवालाचे फेरनिरीक्षण होण्याची अपेक्षा आहे. या सर्व घडामोडी बघता राज्य शासन २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात हे महाविद्यालय सुरू होण्याबाबत आशावादी आहे. दरम्यान, यासंदर्भात निर्णय घेण्याचा सर्वाधिकार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला आहे. त्यामुळे ते सकारात्मक निर्णय घेईल, अशीही राज्य शासनाला आशा आहे. त्यासाठीच सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आज वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करून संबंधितांना महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. प्रदीप दीक्षित, कार्यकारी अभियंत्ता सोनाली चव्हाण, इंडियन मेडिकल असोशिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. एम.जे. खान व कंत्राटदार उपस्थित होते.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या पुढील भेटीपूर्वी या महाविद्यालयातील सुविधा पूर्ण करण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या महाविद्यालयासाठी लागणारे साहित्य, फर्निचर, औषधी, संगणक इत्यादी खरेदीसाठीच्या प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या महाविद्यालयाच्या इमारतीचे फायर ऑडिट महापालिकेकडून तत्काळ करून घ्यावे, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मुलांचे वसतिगृह व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची पाहणी केली. इमारतीचे विद्युतीकरण, मलनि:स्सारण व्यवस्था, गॅस पाईपलाईन व पाणी पुरवठा या बाबी काळजीपूर्वक करण्यात याव्यात, असे ते म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत हस्तांतरित करण्यापूर्वी ती वापरण्यायोग्य असली पाहिजे, याची खबरदारी बांधकाम विभागाने घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Inspection of chandrapur medical college

ताज्या बातम्या