निरीक्षकाचे वाहन जाळून घराची नासधूस; पोलिसांचा हवेत गोळीबार

सोनपेठमध्ये पोलिसांनी केलेल्या अमानूष मारहाणीमुळे युवकाने आत्महत्या केली. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या जमावाने पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक केली. जमावाने सहायक पोलीस निरीक्षकांचे शासकीय वाहनही जाळले, तसेच शासकीय निवासस्थानातील सामानाची नासधूस केली.

सोनपेठमध्ये पोलिसांनी केलेल्या अमानूष मारहाणीमुळे युवकाने आत्महत्या केली. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या जमावाने पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक केली. जमावाने सहायक पोलीस निरीक्षकांचे शासकीय वाहनही जाळले, तसेच शासकीय निवासस्थानातील सामानाची नासधूस केली. थेट पोलीस ठाण्यावर चालून आलेल्या जमावाचे नियंत्रण कसे करायचे, हा पेच पोलिसांपुढे निर्माण झाला. या पाश्र्वभूमीवर हवेत गोळीबार करून जमाव पांगविण्यात आला. पोलिसांनी सहा फैरी झाडल्या.
या प्रकारामुळे गुरुवारी दिवसभर शहरातील तणाव कायम होता. पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोनपेठचे लोक सायंकाळपर्यंत आग्रही होते. सोनपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी मुरलीधर दत्तात्रय हाके या किराणा दुकानदाराच्या राहत्या घरी गुटखा पकडण्याच्या उद्देशाने छापा टाकला. मात्र, या वेळी घरात कोणीही नव्हते. घराचे कुलूप तोडून कर्मचाऱ्यांनी घराची पाहणी केली. या वेळी किरकोळ स्वरूपात गुटख्याच्या पुडय़ा घरात आढळून आल्या. घराशेजारी हाके यांचा विठ्ठल (वय ३०) हा मुलगा लग्न झाल्यापासून पत्नीसमवेत वेगळा राहत असे. वडिलांच्या घरात पोलीस कुलूप तोडून काय करतात, हे विचारण्यास गेलेल्या विठ्ठलला ३ कर्मचाऱ्यांनी धमकावत मारहाण सुरू केली. ‘तूच गुटखाविक्री करतो’, असे म्हणत मारहाण करीत त्याला घराबाहेर ओढत आणले व तेथून पोलीस ठाण्यापर्यंत पायी िधड काढली. गुटखा घ्या गुटखा असे जोरात ओरडण्यासही भाग पाडले. पोलीस ठाण्यात गेल्यानंतरही पोलिसांनी बेदम मारहाण केली.
सायंकाळी मुरलीधर हाके पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी विठ्ठलला सोडवले. घरी परतल्यावर झालेल्या प्रकाराबाबत विठ्ठलला प्रचंड धक्का बसला. आपला गुटखाविक्रीशी काही संबंध नसताना लावलेले आरोप व झालेली मारहाण यामुळे विठ्ठल घाबरला होता. गुरुवारी सकाळी विठ्ठलने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कळताच त्याच्या नातेवाईकांसह सोनपेठ शहरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करत जोरदार दगडफेक केली. विठ्ठलच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पोलिसांना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करीत जमावाने पोलीस ठाण्याला चहुबाजूने घेरले. जमावाचा रोष सहायक निरीक्षक तिडके यांच्यावर होता. त्यामुळे तिडके यांच्या शासकीय निवासस्थानाकडे जमावाने धाव घेतली. जमाव एवढा बेभान झाला होता की, या निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या तिडके यांच्या मालकीची मोटार जमावाने पेटवून दिली. या वेळी जमावाने या निवासस्थानातील साहित्याची तोडफोड केली. जमाव पुन्हा पोलीस ठाण्याकडे आला व पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकीही जमावाने पेटवून दिली. सायंकाळी उशिरापर्यंत जमाव संतप्त होता.
जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर, सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत विठ्ठलच्या पाíथवाचे शवविच्छेदन झाले नव्हते. या प्रकाराने दिवसभर सोनपेठ शहर धुमसत राहिले. सोनपेठ शहरात या घटनेचे जोरदार पडसाद उमटले. शहरात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. जमाव नियंत्रणात आला असला, तरी दिवसभर अस्वस्थता असल्याने सोनपेठमधील चित्र गंभीर होते. विठ्ठल हाकेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप करीत सहायक निरीक्षक तिडके यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी सोनपेठचे नागरिक सायंकाळी उशिरापर्यंत ठाण मांडून होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Inspector destroy the house burned the vehicle police fired in the air

ताज्या बातम्या