पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यानंतर सर्वात प्रथम पाणी हवे का अशी विचारणा ठाणे अंमलदाराकडून या पुढे होईल, तशा सूचना ठाणा प्रभारींना देण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.गेले चार दिवस सांगली जिल्हा मुख्यालयासह विटा, तासगाव, मिरज, महात्मा गांधी चौक आदी पोलीस ठाण्याची वार्षिक पडताळणी केल्यानंतर श्री. फुलारी यांनी माध्यम प्रतिनिधींशी आज संवाद साधला.
यावेळी त्यांनी सांगितले, की सामान्य माणसामध्ये पोलीसांच्याबाबत आपुलकी निर्माण व्हावी, पोलीस हा जनतेचा रक्षक व सेवक आहे ही भावना निर्माण होणे गरजेचे आहे. तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येणार्या प्रत्येकाला अगोदर पाणी हवे का अशी विचारणा करून त्याच्या तक्रारीची दखल घ्यावी, त्यानंतर त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना देण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन वर्षात चोरी, घरफोडी यामध्ये तुलनात्मकदृष्ट्या १० टक्के वाढ झाली असली तरी गुन्हेगारांना पकडण्याचे कामही चांगल्या पध्दतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यात चार उपअधिक्षक पदे रिक्त असून शासन स्तरावर नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. फरारी आरोपी पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून वर्षभरामध्ये ६५ जणांना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढले असून या गुन्ह्याची उकल करण्यासाठी काही अधिकारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणानंतर स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून या गुन्ह्याची उकल अधिक गतीने करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.