सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सूचना फलकांचा अभाव असल्यामुळे मंगळवारी रात्री एक भीषण अपघात घडला. इन्सुली खामदेव नाका येथे कार २५ फूट खोल गटारात कोसळून झालेल्या या अपघातात ४ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. शौर्य सचिन तुयेकर (रा. चराठा कॉलनी, सावंतवाडी) असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास कार इन्सुलीहून सावंतवाडीच्या दिशेने जात होती. खामदेव नाका येथे पोहोचल्यावर पुलाच्या सुरू असलेल्या कामाचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट २५ फूट खोल गटारात कोसळली. या भीषण अपघातात शौर्य कारबाहेर फेकला गेला आणि कोसळलेली कार त्याच्या अंगावर पडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सूचना फलकांचा अभाव कारणीभूत:
अपघातानंतर शौर्यला तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. गज सारंग यांनी त्याला मृत घोषित केले. या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असताना कंत्राटदाराने कोणत्याही प्रकारचे सूचना फलक किंवा धोक्याचे संकेत लावले नसल्याने हा अपघात घडल्याचा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
कुटुंबावर शोककळा:
मृत शौर्यचे वडील सचिन तुयेकर हे तिलारी पाटबंधारे विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत. अपघाताची बातमी समजताच बांदा आरोग्य केंद्रात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. बुधवारी सकाळी तिलारी कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनीही घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन सांत्वन केले. एका निष्पाप बालकाचा बळी गेल्याने सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
