अहिल्यानगर : घरफोड्या करणारी आंतरजिल्हा टोळी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून, टोळीकडून २५० ग्रॅम सोन्यासह २४ लाख २६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल तसेच गावठी कट्टा जप्त केला आहे. या टोळीने नगरसह सातारा, नाशिक, पुणे येथे १६ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी ही माहिती दिली. मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले (वय २८, बेलगाव, कर्जत), सुनीता उर्फ सुंठी देविदास काळे (वय ३५, नारायण आष्टा, आष्टी, बीड) या दोघांसह एका सतरा वर्षांच्या विधीसंघर्षित युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीतील शुभम उर्फ बंटी पप्पू काळे, सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले, संदीप ईश्वर भोसले, कुऱ्हा ईश्वर भोसले हे चौघे फरार झाले आहेत.
बोटा (संगमनेर) येथील शालिनी बळीराम शेळके यांच्याकडे २० जूनला घरफोडी होऊन सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करताना ही टोळी निष्पन्न झाली. बंद घरांची टेहळणी करून ही टोळी घोरफोडी करत होती. ईश्वर भोसले हा त्याच्या बहीण व पत्नीमार्फत चोरलेले दागिने सोनारास विकत होते. या सोनाराकडून ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले. तसेच घरामागे खड्डा करून लपवलेले दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले.
अटक केलेला मिलिंद भोसले हा सराईत आरोपी असून, त्याच्याविरुद्ध १८ गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार गणेश धोत्रे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनील मानकर, भगवान थोरात, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भगवान धुळे व भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.