काँग्रेस-भाजप दोघांचा एकमेकांवर ‘पूर्वनियोजित’चा आरोप
नंदुरबार नगरपालिकेच्या सभागृहात काँग्रेस-भाजप नगरसेवकांमध्ये मंगळवारी झालेली हाणामारीची घटना पूर्वनियोजित असल्याचा आरोप आता दोन्ही पक्षांकडून होत आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीतील उणेदुणे काढण्याचे काम नगरसेवक आजही नेटाने करीत आहेत. पालिका सभागृहात गावगुंडाप्रमाणे वर्तन करणारे नगरसेवक हे विकास कामांसाठी आहेत की वैयक्तिक वचपा काढण्यासाठी, असा प्रश्न नंदुरबारकरांना पडला आहे.
मागील अनेक वर्षांपासून नंदुरबार नगरपालिकेत आमदार चंद्रकात रघुवंशी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. याच काँग्रेससोबतची चूल स्वतंत्र करून अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत आपल्या बंधूच्या माध्यमातून भाजपतर्फे निवडणूक लढवत सत्तापरिवर्तनाचे मनसुबे बांधले होते. परंतु नंदुरबार नगरपालिकेत पुन्हा एकदा रघुवंशी गटाला यश मिळाले आणि भाजपला अवघ्या ११ जागांवर समाधान मानावे लागले. या पालिकेच्या निवडणुकीत रघुवंशी आणि चौधरी गटाने परस्परांवर खालच्या पातळीचे आरोप करत पत्रकबाजीही केली होती. निवडणूक निकालानंतर देखील ही धुसफूस अद्यापही कायम असल्याचे आतापर्यंत झालेल्या पालिकेच्या तीनही सभांमध्ये पाहावयास मिळाले. कधी काळी पालिका वादातून खून होण्यापर्यंत घटना घडलेली असल्याने नंदुरबार नगरपालिकेत ३८ वर्षांनंतर जोरदार धुमश्चक्री उडाल्याने नागरिक पुन्हा धास्तावले आहेत. या दोन्ही बडय़ा नेत्यांच्या समर्थकांनी उपरोक्त घटनेनंतर उपद्रव माजविल्याचा आरोपही होत आहे. या घटनेनंतर बाजारात धावपळ उडून गोंधळ उडाला होता. त्यामुळे दोन्ही गट परस्परांना शह देण्याच्या प्रयत्नात गाव वेठीस धरत असल्याची भावना बळावली आहे.
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी या नगराध्यक्ष असल्याने ते एकहाती मनमानी पद्धतीने पालिकेचा कारभार चालवत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. पालिकेतील हाणामारी ही त्यांना भाजपने सभागृहात उभा केलेला पर्याय मोडून काढण्यासाठी असल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी करतात. तर लोकशाही माध्यमातून जनतेने दिलेला कौल भाजपच्या एका गटाला जिव्हारी लागल्याने वैयक्तिक हेवेदावे काढण्यासाठी त्यांच्याकडून लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याचा आरोप आ. रघुवंशी यांनी केला आहे. विशेष म्हणजे, पालिक सभागृहातील हाणामारीनंतर दोन्ही गटांनी एकमेकांना कायद्याच्या कचाटय़ात अडकविण्यासाठी अॅट्रॉसिटी, दरोडा, महिला विनयभंग आदींसारख्या कलमांचा आधार घेतला. धुमश्चक्रीच्या चित्रफिती प्रसारित झाल्याने या आरोपातील तथ्य पोलिसांकडून तपासले जाईल.
मात्र पालिकेतील हे दोन्ही गट परस्परांचा वचपा काढण्यासाठी एकही संधी दवडत नसल्याने आणखी पाच वर्षे पालिकेचे कामकाज कशा पद्धतीने चालणार याची धास्ती नागरिकांना आहे. खरे तर निवडणुकीनंतर राजकीय मतभेद विसरून कामाला लागतात. मात्र नंदुरबारची राजकीय परिस्थिती पाहता बडय़ा नेत्याच्या मध्यस्तीखेरीज अथवा एका गटाने सामंजस्याची भूमिका घेतल्याशिवाय हा वाद मिटणार नाही. हीच स्थिती कायम राहिल्यास आगामी काळात त्याचे व्यापक परिणाम नंदुरबारकरांना भोगावे लागतील. पुढील काळात हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.