अपुरा पाऊस, नापिकी, कर्जाचा डोंगर यामुळे राज्यात आणि देशात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. सरकारकडून कर्जमाफी, पीक विमा आदी योजनांद्वारे बळीराजाला या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पण दुसरीकडे मात्र आत्महत्या काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. कर्ते पुरूष कंटाळून आत्महत्येचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. पण इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर ही रडगाणी न गाता..अवघ्या काही गुंठ्यात..आदर्श आणि यशस्वी शेती कशी करता येते याचा वस्तूपाठच एका माऊलीने उभा केला आहे. मनीषाताई भांगे असे या माऊलीचे नाव असून त्यांनी खैरेवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेती कशी करावी याचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. अशिक्षीत असूनही एखाद्या कृषी तज्ज्ञाला लाजवेल अशी कामगिरी त्यांनी केली आहे. हाती तीन एकर माळरान, पाण्याची कमतरता अशा परिस्थितीलाही न डगमगता यशस्वी शेती करत त्यांनी शेतीपूरक उद्योगही उभा केला. अवघ्या ३ गुंठा शेतीत ५२ पिके घेण्याची किमया त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता त्यांनी सेंद्रिय शेती करून पर्यावरणाची हानीही टाळली. निरोगी समाज निर्मितीस सहकार्य म्हणून सुमारे १० हजार कुटुंबांना त्यांनी मोफत शेवगा बी आणि रोपांचे वाटप केलं आहे. आधुनिकतेबरोबर पारंपारिक शेतीचा स्वीकार त्यांनी केला. ३ गुंठा आणि ३ एकर शेतीचे मॉडेल कृषी जगतासमोर आणले आहे. आज त्यांची ही कामगिरी पाहण्यासाठी राज्यातून, देशातून विविध संस्था, व्यक्ती आवर्जून येतात.

पोटासाठी गाव सोडलं..

साधारणपणे १९८० च्या सुमारास प्रतिकूल परिस्थितीमुळे मनीषाताईंनी पती भागवत यांच्यासह एक मुलगा आणि मुलीला घेऊन गाव सोडलं आणि रोजीरोटीसाठी पुणे गाठलं. पुण्यासारख्या मोठ्या शहरात तगण्यासाठी पती भागवत मोलमजुरी करू लागले. पतीला हातभार लागावा म्हणून मनीषाताईंनी घरोघरी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. कालांतराने पुण्यात राहणे जिकिरीचे झाल्यामुळे त्यांनी परत आपल्या गावाचा रस्ता धरला आणि शेती करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांची शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून होती. शेतातल्या विहिरीत फक्त पावसाळ्यातच पाणी असे.. इतरवेळी पिण्याच्या पाण्याची ओरड तिथे शेती कशी करायची हा त्यांच्यासमोरील यक्ष प्रश्न. यावर उपाय म्हणून त्यांनी काही वर्षांपूर्वी शेतात कूपनलिका घेतली. याचदरम्यान पतीचे निधन झाले. एका संकटातून बाहेर निघतोय असे वाटत असतानाच त्यांच्यावर हा दुसरा आघात झाला. परंतु, अशाप्रसंगीही त्यांनी न खचता लढाऊ वृत्ती दाखवत यावर मात केली. शेती करत असतानाच सर्वांत प्रथम दुग्ध व्यवसायाचा जोडधंदा सुरू केला. शेळी पालन केले. यातूनच त्यांना नवे मार्ग मिळत गेले. कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पेलत त्यांनी मुलांना उच्च शिक्षण दिलं. मुलगा गुरूनाथला बीएसस्सी, एमएसडब्ल्यूपर्यंत शिकवलं. तो आता चांगल्या हुद्द्यावर कार्यरत असून आपल्या आईच्या शेतीच्या प्रयोगात त्यानं स्वत:लाही वाहून घेतलं आहे.

mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
nashik, Manmad, Severe Water Shortage, Wagdardi Dam, Near Depleting, water storage,
वागदर्डीतील मृतसाठाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर; मनमाडकरांची पाणी टंचाई तीव्र होण्याची चिन्हे
water crises banglore
गार्डन सिटी बंगळुरूत पाणीच नाही; तीव्र टंचाईमागे काय आहे कारण?

काय आहे ३ गुंठा आणि ३ एकर मॉडेल..

शेतीची आवड असल्यानं त्यांनी नवनवीन प्रयोग करण्यास सुरूवात केली. सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला. शेतामध्ये जीवामृत आणि गांडूळ खताचा उपयोग केला. ३ गुंठ्यात ते ५२ पिके घेतात. यामध्ये १५ फळझाडे, ११ औषधी वनस्पती १६ प्रकारची फळभाज्या आणि पालेभाज्या, ६ प्रकारची फुले, ४ प्रकारची वन झाडांची लागवड केली आहे. २ गुंठा जागेत कॉफी लागवड केली आहे. नातवांना सर्व फळांचा आस्वाद घेता यावा म्हणून केलेली फळ बाग लागवड आज त्यांना उत्पन्न मिळवून देत आहे. यावर्षी शेतामध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा मिलाफ घडवून आणला आहे. पारंपारिक शेतीत त्यांनी उच्च ऊर्जा मूल्ये असणारी पिके जसं की राजगिरा, तीळ, जवस यांची १५ गुंठ्यामध्ये लागवड केली. सोबतच आवळा पावडर, गुंजेचा पाला आणि पावडर, शेवगा आणि कडीपत्ता पावडर बनवून छोट्या स्वरूपात त्याची विक्रीही सुरू केली आहे. ग्रामीण भागात शेतातल्या बांधावरून अनेकवेळा एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत वाद जातात. पण मनीषाताईंनी मुलाच्या मदतीनं बांधावर सुमारे ४०० सागाची झाडं लावली. २० वर्षांनंतर यातून त्यांना लाखो रूपयांचे उत्पन्न मिळण्याची हमी आहे.

शेतीपूरक व्यवसायावर भर..

शेतीबरोबरच त्यांनी शेतीपूरक व्यवसायावर भर दिला. यामुळे त्यांचा आर्थिक पायाही भक्कम झाला. तीळ, जवस, मोहरीचे पीक ते घेतात. यापासून स्वतः छोटा तेलघाणा घेऊन तेल काढतात आणि जास्तीच्या तेलाची विक्रीही करतात. जात्यावर स्वतःच्या शेतात पिकवलेल्या सेंद्रिय डाळी करून त्याची विक्री करतात. यावर्षी ही डाळ संयुक्त अरब अमिराती पर्यंत पोहोचली आहे. तसेच शेजाऱ्याच्या शेतकऱ्यांकडून केळी विकत घेऊन त्याचे वेफर्स करून त्याचीही विक्री त्यांनी केली. शिवाय शेतातल्या आवळ्यापासून कँडीचा उद्योगही सुरू केला. देशी गाईंचे संगोपन करून त्यांच्या गोमूत्र आणि शेण यांचा वापर करून शेती करतात. अग्निहोत्र यज्ञासाठी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या लागतात. त्या या गोवऱ्या बनवून त्याची विक्री करतात. या सर्वांतून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. सोबतच तुळशी आणि हादगा बियाणे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर तामिळनाडू, केरळ, गुजरात, तेलंगणा या राज्यातील लोकांना मोफत देण्याचे सत्कार्यही त्या करतात.

मनात आवड, इच्छा आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर काहीही साध्य करता येऊ शकते हे मनीषाताईंनी आपल्या कृतीतून सर्वांना दाखवून दिले आहे. अशिक्षित असतानाही त्यांनी मोठमोठ्या सुशिक्षितांना मार्ग दाखवला आहे. कोणत्याही परिस्थितीला न डगमगता खंबीरपणे त्याला तोंड दिल्यास यश नक्की मिळते, हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. महिला दिनानिमित्त या नारीला सलाम.

  • दिग्विजय जिरगे
    divijay.jirage@gmail.com