International Yoga Day 2025 : आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह महाराष्ट्रात देखील मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शेकडो वारकऱ्यांबरोबर योग दिन साजरा केला आहे. राज्य सरकारच्या पुढाकाराने ‘वारकरी भक्तीयोग’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वारकरी भक्तियोग या उपक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रमुख उपस्थिती लावत हजारो वारकरी, विद्यार्थ्यांबरोबर योगासने केले आहेत. या कार्यक्रमासाठी प्रशासनाने मोठी तयारी देखील केली होती.

श्रीकांत शिंदेंचाही योग सत्रात सहभाग

शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत मरिन ड्राइव्ह या ठिकाणी आयोजित योग सत्रात सहभाग घेत शेकडो नागरिकांबरोबर योगासनं केली आहेत.

नितिन गडकरी यांचाही योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूरच्या यशवंत स्टेडियम धंतोली येथील ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी मंत्री नितिन गडकरी यांनी शेकडो नागरिकांबरोबर योगासनं केली आहेत.

“अलौकिक अनुभव…”, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा योग सत्रात सहभाग

भारतीय पक्षाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुण्यातील कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, “आषाढी वारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी दाखल झाल्या आहेत. यंदा त्याच वेळी जागतिक योग दिन आला असल्याने उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका, राष्ट्रीय सेवा योजना, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र देहू, विद्यार्थी विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात अलौकिक भक्तीयोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लाखो वारकऱ्यांनी योगाभ्यास केला. आजचा हा भक्ती-शक्तीचा संगम असलेला कार्यक्रम वेगळीच अनुभूती देणारा होता”, असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

या कार्यक्रमास मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी माधुरीताई मिसाळ, खा.मेधाताई कुलकर्णी, आ.भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सदानंद मोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.अशोक उबाळे यांच्यासह देहू-आळंदी देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी आणि प्रमुख दिंड्यांचे दिंडी प्रमुख, सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.