हलक्या जातीची म्हणून सुनेला घरात स्वयंपाकासह बाथरूम वापरासही प्रतिबंध

आंतरजातीय प्रेमविवाह करून नांदण्यासाठी सासरी गेलेल्या तरूणीला ससरच्या मंडळींनी, हलक्या जातीची असलेली सून आमच्या घरात नको म्हणून तिचा छळ सुरू केला.

हलक्या जातीची म्हणून सुनेला घरात स्वयंपाकासह बाथरूम वापरासही प्रतिबंध
(प्रातिनिधिक छायाचित्र)

सोलापूर : आंतरजातीय प्रेमविवाह करून नांदण्यासाठी सासरी गेलेल्या तरूणीला ससरच्या मंडळींनी, हलक्या जातीची असलेली सून आमच्या घरात नको म्हणून तिचा छळ सुरू केला. तिला स्वयंपाक तयार करायला आणि बाथरूम वापरायलाही दिले जात नव्हते. त्यामुळे अखेर पीडित तरूणीने पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार सासरच्या मंडळींविरूध्द ॲट्रासिटी कायद्यासह हुंड्यासाठी छळ चालविल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

सदर बझार पोलीस ठाण्यात पीडित तरूणी सोनल अतुल बेलखिरे (वय २७, रा. महात्मा फुले झोपडपट्टी, मोदीखाना, सोलापूर) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती अतुल बेलखिरे याच्यासह सासू वंदिता बेलखिरे, सासरा मोतीचंद बेलखिरे आणि दीर राहुल बेलखिरे (रा. गोकुळनगर, कात्रज, पुणे) यांच्या विरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पीडीत सोनल हिच्या फिर्यादीनुसार ती मागासवर्गीय समाजाची आहे. तिचा आंतरजातीय प्रेमविवाह अतुल बेलखिरे याजबरोबर १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यात आळंदी येथे झाला होता. त्यानंतर ती सासरी नांदण्यासाठी गेली. या आंतरजातीय विवाहासाठी मध्यस्थी राहिलेल्या कल्पना वेनूर सोनल हिच्या सासरी आल्या. तोपर्यंत सासरच्या मंडळींना सोनलच्या माहेरच्या जातीची माहिती नव्हती. तिची जात समजली आणि ती मागासवर्गीय असल्याचे लक्षात येताच सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. तुझ्यासारख्या हलक्या जातीची सून आमच्या घरात राहिलेली चालणार नाही म्हणून तिला घरातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला. तरीही त्रास सहन करीत ती घरातच राहिली. तेव्हा तिला स्वयंपाक करू न देणे, इतकेच नव्हे तर घरातील बाथरूमचा वापरही करू न देणे, घराच्या इमारतीबाहेरील रखवालदारासाठी बांधलेल्या बाथरूमचा वापर करण्यासाठी भाग पाडणे अशा स्वरूपात सासरची मंडळी छळ करू लागली. लग्नात मानपान केला नाही म्हणूनही मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत हे सरकार…”; एकनाथ शिंदेंच्या बंडासंदर्भात अजित पवार स्पष्टच बोलले
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी