ऊस दराबातचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन तीव्र होताच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांना शनिवारी चर्चेस निमंत्रण दिले आहे. दरम्यान तासगांव खानापूर तालुक्यात सुरू असणा-या ऊस तोडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बंद पाडल्या. ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टरची हवा सोडून वाहतूक रोखली.
    तासगावं तालुक्यातील शिरगांव, खानापूर तालुक्यातील कार्वे या ठिकाणी डोंगराई व उदगीर साखर कारखान्याच्या ऊस तोडी सुरू असल्याचे समजताच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाऊन या तोडी थांबविल्या. शिरगांव येथे ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टरची हवा सोडण्यात आली. बोरगांव, चिखलगोठण, िनबळक, कार्वे, शिरगांव आदी परिसरात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती मोच्रे काढले. या मोर्चाद्बारे ऊस दर जाहीर होईतोपर्यंत तोडी स्वीकारू नका असे आवाहन संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे व युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांनी केले.
    दरम्यान ऊस दराबाबत चर्चा करण्यासाठी उद्या (शनिवारी) मुंबईच्या सहय़ाद्री अतिथिगृहात बठक बोलवण्यात आली आहे. या बठकीस खा. राजू शेट्टी, संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत उपस्थित राहणार असल्याचे प्रवक्ते खराडे यांनी सांगितले.