iPhone EMI Dispute and Chhatrapati Sambhajinagar Hill Tragedy : वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगरावरून एका तरुणाने उडी घेतली, त्याला वाचवताना वडिलांचाही तोल गेला आणि त्यांना डोंगरावरून कोसळताना पाहून आईने पाठोपाठ उडी घेतली. तिघेही उंच कड्यावरून खोल खाणीमध्ये पडले. खडकावर आदळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेमागची खरी कहाणी आता समोर आली आहे.

कुणाल चांदगुडे  (वय १८) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मोबाईलचे कॅमेरे सुरू असतानाच कुणाल आणि त्याचे वडील दरीमध्ये कोसळले आणि त्यानंतर पाठोपाठ त्याच्या आईनेही कड्यावरून खाली उडी घेतली.

“तुझ्या आईसाठी तरी जग”, असं एका माणसाने कुणालला सांगितलं, जेव्हा तो कड्यावरून उडी मारण्याची धमकी देत होता. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर कुणालने उत्तर दिलं, “नाही, मला मरावंच लागेल. हाच एकमेव मार्ग उरला आहे.” यानंतर काही वेळातच, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे यांनी त्याला समजावण्याचा आणि मागे ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघेही खाली कोसळले; त्यानंतर आई संगीता यांनीही त्यांच्यापाठोपाठ उडी घेतली.

तिसगाव गावचे माजी सरपंच संजय जाधव हे कुणालची समजूत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक होते. इतरांनी त्याला ‘आयफोन १५ प्रो’ घेऊन देण्याचे आश्वासनही दिलं. “आम्ही त्याला खूप विनवण्या केल्या की त्याने त्याच्या आईकडे पाहावं, त्याने उडी मारू नये, तो सुशिक्षित आहे आणि त्याचं भविष्य पुढे आहे. आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले”, असं जाधव म्हणाले. या संपूर्ण गोंधळादरम्यान कुणाल फक्त खांदे उडवून, ‘मरण हाच माझा एकमेव मार्ग आहे’ यावर ठाम राहिला.

तपास अधिकाऱ्यांनी काय सांगितले?

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणालचा वडिलांशी वाद झाला. या वादाच्या रागातून कुणालने सकाळी १० च्या सुमारास घर सोडलं आणि वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिसगाव परिसरातील एका टेकडीवर तो चढला. त्याचे आई-वडील आणि इतर स्थानिक नागरिक तेथे पोहोचले आणि त्यांनी जवळपास तीन तास त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान हजर असतानाही तेथे सुरक्षा जाळे का उभारले गेले नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास, म्हणजेच हा प्रकार सुरू झाल्यानंतर साधारण तीन तासांनी, कुणालचे वडील तो उभा असलेल्या ठिकाणी चढले आणि त्यांनी त्याला कड्यावरून मागे ओढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात वडील आणि मुलगा दोघांचाही तोल गेला आणि ते खाली खोल दरीमध्ये कोसळले.

पती आणि मुलाला डोळ्यांदेखत कोसळताना पाहून, संगीता यांनीही काही क्षणांतच टेकडीवरून खाली उडी घेतली. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. हा थरार तेथे जमा झालेले अनेक स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांनी पाहिला आणि कुणालची समजूत काढण्याचे काही प्रयत्न व्हिडिओमध्ये कैद झाले आहेत. कौटुंबिक वादाच्या नेमक्या परिस्थितीबाबत किंवा सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार हा तरुण नैराश्याचा सामना करत होता का, यावर पोलिसांनी अद्याप अधिक तपशील शेअर केलेले नाहीत.

डीसीपींनी आयफोनचा मुद्दा फेटाळून लावला

दरम्यान, एबीपी माझाशी बोलताना डीसीपी रत्नाकर नवले म्हणाले, काल घटना झाली आहे. पोलीस तत्काळ घटनास्थळी गेले. स्थानिक नागरिक होते, अग्निशमन दल, अॅम्ब्युलन्सला बोलावण्यात आलं होतं. प्राथमिक तपासातून आत्महत्येमागचं कारण निश्चित सांगता येणार नाही. आयफोनमुळेच त्याने आत्महत्या केली हेही सांगता येत नाही. तपास प्राथमिक टप्प्यावर आहे. बाकीचीही कारणं असू शकतील. एपीआय तपास करत आहेत. तपासात पुढील बाबी स्पष्ट होऊ शकतील. “

कुणालने आयफोनचे हप्ते थकवल्याने आत्महत्या केली असल्याचा दावा केला जातोय. या दाव्यावर त्याचे काका म्हणाले, “त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यांची शेती वगैरे आहे. नीट परीक्षेच्या क्लाससाठी तीन लाख रुपये भरले होते. त्याच्याकडे दोन आयफोन आहेत. त्यांच्याकडे कुत्रा आहे, त्याचाच महिन्याचा खर्च ७ ते ८ हजार रुपये आहे. म्हणजे त्यांचं एकदम चांगलं होतं.”