Iran Israel War Middle East Conflict Impact & Analysis : इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून एकतर्फी कारवाई मोहिमेला दोन आठवड्यांहून अधिक काळ उलटून गेला. पहिल्या टप्प्यात शीर्षस्थ नेतृत्व गमावूनही इराण उत्तरोत्तर आक्रमक बनत आहे. त्याची झळ पश्चिम आशियातील अगतिक अरब देशांना आणि या निमित्ताने जवळपास निम्म्याहून अधिक जगाला बसू लागली आहे. आता तर इराणच्या संभाव्य शरणागतीऐवजी इस्रायलकडील शस्त्रास्त्रे संपून तोच हतबल होण्याची चिन्हे आहेत.

इराणच्या सामर्थ्याविषयी, भूगोलाविषयी आणि निर्धाराविषयी फारशी माहिती घेण्याचे कष्ट डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या युद्धखोर मंत्रिमंडळाने घेतलेले दिसत नाहीत. त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीला हे साजेसेच. पण इराणच्या घोषित आणि अघोषित सामर्थ्याची कल्पना इस्रायलचे पंतांप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नक्कीच होती. इराणची जवळपास सर्व क्षेपणास्त्रे २००० किलोमीटर पल्ल्याची आहेत. ती खास इस्रायलसाठीच गेली अनेक वर्षे बनवण्यात येत होती. याशिवाय इराणने मोठ्या प्रमाणात ड्रोन निर्मितीवर लक्ष केंद्रित केले होते. असे ड्रोन्स युक्रेन युद्धातही मोठ्या प्रमाणावर वापरले गेले. तरीदेखील इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी आणि त्यांच्या सर्वोच्च लष्करी सल्लागारांचा खात्मा केला, तसेच इराणच्या नगण्य हवाईदलाचा नि अमेरिकेच्या तुलनेत फारच कमकुवत असलेल्या नौदलाचा निःपात केल्याच्या बढाया ट्रम्प आणि त्यांचे सहकारी मारत राहिले. त्यातून बेसावध राहिले. इराणची ताकद ही त्यांच्या क्षेपणास्त्रांमध्ये आणि संपूर्ण इराणभर विखुरलेल्या आणि जवळपास निर्नायकी अवस्थेतही कार्यरत राहू शकणाऱ्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी कमांड कौन्सिल’मध्ये आहे हे ट्रम्प यांच्या गावी नसणारच. पण इस्रायलला याची पूर्ण कल्पना होती. तरीदेखील नेतान्याहूंच्या हट्टाखातर अमेरिकेच्या साह्याने इराणवर पहिल्या दिवशी अर्धा डझन शहरांवर हल्ले झाले. इराणने हा हल्ला त्यांच्या सार्वभौमत्वावर असल्याचे जाहीर करत प्रतिहल्ले सुरू केले. त्याची फळे आज जवळपास संपूर्ण जगाला भोगावी लागत आहेत.

इराणची ‘समांतर विध्वंस’नीती!

इराणने समांतर विध्वंसाचा (कोलॅटरल डॅमेज) मार्ग पत्करला आणि आसपासच्या अरब देशांवर हल्ले सुरू केले. या बहुतेक देशांमध्ये अमेरिकेचे नाविक, लष्करी किंवा हवाई तळ आहेत. त्यांच्यावर हल्ला करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे असे इराण धरून चालतो. या भूमिकेचा प्रतिवाद आजवर कुणासही करता आलेला नाही. इराणने अर्थातच इस्रालयवरही हल्ले सुरू केले. असे हल्ले इराण करू शकतो याची पुरेशी कल्पना नेतान्याहूंना गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या ‘१२ दिवसांच्या युद्धा’च्या निमित्ताने आली होती. तरीदेखील त्यांनी असा आततायीपणा केला कारण खामेनी संपल्यावर इराण शरण येईल अशा भ्रमात तेही राहिले. ट्रम्प आणि नेतान्याहू या दोघांनीही समांतर विध्वंसाबाबत इराणने युद्धपूर्व काळात दिलेल्या धमक्यांना गांभीर्याने घेतले नाही. इराणने याबाबत दोघांनाही गाफील गाठले. अरब देशांमधील तळांचे रक्षण करण्यासाठी पुरेसा फौजफाटा अमेरिकेकडे सध्या नाही. यासाठीच ‘यूएसएस गेराल्ड फोर्ड’ आणि ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ या विमानवाहू युद्धनौका अमेरिकेने पश्चिम आशियात तैनात केल्या. इराणवर हल्ले करण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत (२७ फेब्रुवारी), जीनिव्हात अमेरिका अणि इराणच्या प्रतिनिधींमध्ये ओमानच्या मध्यस्थीने वाटाघाटी सुरू होत्या. त्यांकडे दुर्लक्ष करून आणि पहिल्याच दिवशी सर्वोच्च धार्मिक नेत्यांना लक्ष्य केल्यामुळे इराणमध्ये अभूतपूर्व संताप होता. या संतापाला आक्रमक हालचालींमध्ये इराणने वाट मोकळी करून दिली. इराणच्या लष्करी सामर्थ्यासमोर, विशेषतः क्षेपणास्त्र प्रहारासमोर आजूबाजूच्या तमाम अरब देशांचे लष्करी सामर्थ्य जवळपास नगण्य आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींनी गेल्या चार वर्षांमध्ये ते वाढवण्यास सुरुवात केली आहे. तरी हे बहुतेक देश स्वसंरक्षणासाठी आजही पूर्णपणे अमेरिकेवर विसंबून आहेत. त्यांचे विमानतळ, तेल प्रकल्प, नागरी वस्त्या, रडारकेंद्रे, डेटा सेंटर, हॉटेल यांच्यावर क्षेपणास्त्रे येऊ लागली, त्यांतील बरीच अमेरिकेच्या क्षेपणास्त्र बचाव प्रणालीने पाडली. तरीदेखील काहींनी लक्ष्याचा वेध घेतलाच. यातून अल्प प्राणहानी झाली, बरीच वित्तहानी झाली. पण यापेक्षा कितीतरी अधिक दीर्घकालीन प्रतिमाहानी झाली. पर्यटन, सेवा क्षेत्र, डेटा सेंटर, तेल उद्योगांशी संबंधित सेवा, मोक्याची बंदरे आणि सुरक्षित, सुसज्ज विमानतळ अशा विविध घटकांमुळे जगभरातील आणि विशेषतः आशियातील लाखो रोजगारार्थींनी आखाती देशांमध्ये घरोबा केला होता. आज यांतील बहुतेकांना ‘सुरक्षित अरब देश’ या संकल्पनेतला फोलपणा आकळू लागला आहे. इराणमध्ये अवघ्या काही दिवसांमध्ये तो दाखवून दिला. होर्मुझ खाडीची नाकेबंदी हा इराणच्या नीतीतला शेवटचा हुकमी एक्का ठरतो. इराणची चाल त्यांच्या सामरिक उद्दिष्टाच्या दृष्टीने १०० टक्के यशस्वी ठरली. पण याचा फटका तेल आणि गॅस समृद्ध अरब देशांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लाभार्थी देशांना बसत आहे.

इस्रायलचा क्षेपणास्त्र बचाव गलितगात्र?

इस्रायलच्या पाच स्तरीय क्षेपणास्त्र बचाव प्रणालीचा गाजावाजा गेल्या वर्षीपर्यंत होत होता. आयर्न डोम, डेव्हिड स्लिंग, अॅरो, थाड अशा विविध स्तरांवर विविध क्षमतेच्या क्षेपणास्त्रांचा मारा थोपवण्याची इस्रायलची क्षमता असल्याचे बोलले वा लिहिले जात होते. ही प्रणाली गेल्याच वर्षी काही प्रमाणात कुचकामी असल्याचे किंवा किमान पूर्णतया अभेद्य नसल्याचे दिसून आले. या संघर्षात तर इराणच्या क्षेपणास्त्रांनी जवळपास प्रत्येक दिवशी इस्रायलमधील कोणत्या ना कोणत्या लक्ष्याचा वेध घेतलेला दिसतो. इस्रायलमध्ये आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांवर वार्तांकनाची बंदी असल्यामुळे तेथीन नुकसानाचा पुरेसा अंदाज येत नाही. पण इराणची क्षेपणास्त्रे थोपवताना इस्रायली बचाव प्रणालीची दमछाक होत असल्याची कुजबूज सर्व थरांवर होऊ लागली आहे. अमेरिकी युद्धनौका, अमेरिकी लढाऊ विमाने आणि अमेरिकी रडार यंत्रणा दिमतीला नसत्या तर एव्हाना इराणप्रमाणचे इस्रायलमध्येही विध्वंस दिसून आला असता.

अमेरिकेसाठी युद्धाची ‘किंमत’

गेल्या १५ दिवसांमध्ये १३ अमेरिकी सैनिक इराणवरील कारवाईदरम्यान किंवा इराणकडून झालेल्या प्रतिहल्ल्यांत मरण पावले आहेत. ही ज्ञात संख्या आहे. बहारिन, कुवेत, कतार, यूएई येथील अमेरिकी तळांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये काय नुकसान झाले याचा तपशील आलेला नाही. कुवेतमध्ये अमेरिकेने तीन एफ-१५ लढाऊ विमाने गमावली. इतकी लढाऊ विमाने अमेरिकेने गेल्या कित्येक वर्षांत गमावलेली नाहीत. इराणचे शाहेद ड्रोन निकामी करण्यासाठी पेट्रियट क्षेपणास्त्र बचाव प्रणालीला वापर अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शाहेद ड्रोन स्वस्तातले आहेत, त्यांचा विध्वंस करण्यासाठी अमेरिका वापरत असलेले एकेक क्षेपणास्त्र अत्यंत महागडे आहे. पहिल्या दोन आठवड्यांमध्येच अमेरिकेच्या या बचाव प्रणालीमुळे जवळपास २०० अब्ज डॉलरचा चुराडा झाल्याचे विश्लेषक सांगतात. इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेची वित्तहानी व्हिएतनाम युद्ध आणि इराक युद्धामध्येही झाली नव्हती. इराणला कमी लेखल्यामुळे आणि आता युद्ध थांबवायचे कधी याविषयी नेमका कार्यक्रमच नसल्यामुळे पश्चिम आशियातील आजवरचा सर्वांत विध्वंसक संघर्ष लांबत चालला आहे. यातून अरब देशांची अगतिकता वाढतच आहे.

siddharth.khandekar@expressindia.com