अलिबाग : इराण-इस्रायल युद्धाचा फटका आता थेट देशातील हॉटेल व्‍यवसायाला बसत असल्याचे दिसत आहे. व्‍यावसायिक वापराच्‍या गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्‍यामुळे रायगड जिल्‍ह्यातील हॉटेल व्‍यवसाय संकटात आला आहे. दुसरीकडे गॅस तुटवडयाच्‍या भीतीने घरगुती गॅस सिंलेडरचे बुकींग दुपटीहून अधिक वाढले आहे.

गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ग्राहकांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. आगामी काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर जिल्‍ह्यातील हॉटेल व्यवसाय पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हॉटेल व्‍यवसायासाठी लागणारे व्‍यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्‍याचा निर्णय यापूर्वीच घेण्‍यात आला होता. मात्र तरीही काही दिवस व्‍यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरूच होता. परंतु आता तो बंद झाल्‍याने पुढील काही दिवसात हॉटेल बंद ठेवावे लागणार असल्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्‍या बुकींगमध्‍ये भरमसाठ वाढ झाली आहे. ज्‍या ठिकाणी दिवसाला 700 ते 800 बुकींग होत असे तेथे दीड तें दोन हजारांपर्यत बुकींग पोहोचले आहे.

आम्‍ही दिवसाकाठी 100 व्‍यावसायिक गॅस सिलेंडर वितरीत करतो. परंतु दोन दिवस झाले व्‍यावसायिक सिलेंडरचा पुरवठा झालेला नाही. घरगुती गॅसचा तुटवडा भासण्‍याच्‍या भीतीने ग्राहकांमध्‍ये चलबिचल असून बुकींग मोठया प्रमाणात वाढले आहे. – कैलास जगे, भारत गॅस वितरक

आमच्‍याकडे जेमतेम आठवडाभर पुरेल इतकेच गॅस सिलेंडर उपलब्‍ध आहेत. त्‍यानंतर काय करावे असा प्रश्‍न आहे. गॅस सिलेंडर उपलब्‍ध झाले नाही तर हॉटेल बंद करावे लागणार आहे. सध्‍या परीक्षांचा काळ असल्‍याने हॉटेलमध्‍ये गर्दी कमी आहे. पर्यटकांची संख्‍या वाढल्‍यास परीस्थिती बिकट होणार आहे. – यशवंत हरेर, हॉटेल व्‍यावसायिक

कॅटरींग व्‍यवसाय संकटात

सध्‍या साखरपुडा, लग्‍न समारंभ, सुरू आहेत. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणात जेवणावळी झडताहेत. कॅटरींगच्‍या व्‍यवसायाला सुगीचे दिवस आहेत. परंतु व्‍यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्‍याने हा व्‍यवसायदेखील संकटात आला आहे. कार्यक्रमाच्‍या आगावू घेतलेल्‍या बुकींग कशा पूर्ण करायच्‍या असा प्रश्‍न कॅटरींग व्‍यावसायिकांना पडला आहे. जर गॅस सिलेंडर उपलब्‍ध झाले नाहीत तर लाकूडफाटा आणून चुली पेटवाव्‍या लागतील असे एका व्‍यावसायिकाने सांगितले.