वर्षभराने होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व म्हणजे पाचही पाटबंधारे विकास महामंडळांच्या सर्वच उपाध्यक्षांची फेरनियुक्ती केली आहे.
सत्ताधारी पक्षाच्या सर्वच आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेणे शक्य नसल्यामुळे त्यांना विविध शासकीय महामंडळे किंवा मंडळांवर नेमून खूश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या राज्यातील पाटबंधारे विकास महामंडळांवर अशासकीय सदस्य म्हणून याच दृष्टिकोनातून आमदारांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली जाते. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असून इतर चार महामंडळांच्या उपाध्यक्षांचा दर्जा राज्यमंत्र्याचा आहे. बहुतेक ज्येष्ठ आमदारांना या पदावर नेमले जाते.
तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी सध्या कळवण (जि. नाशिक) येथील आमदार ए.टी. पवार आहेत. सर्वाधिक महत्त्वाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद जुन्नरचे आमदार वल्लभ बेनके यांच्याकडे आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद परांडा (जि. उस्मानाबाद) येथील आमदार राहुल मोटे यांच्याकडे आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी वर्धा येथील आमदार सुरेश देशमुख हे आहेत.
पाचही पाटबंधारे विकास महामंडळांच्या उपाध्यक्षांची मुदत संपल्याने या पदावर नियुक्तीचा विषय सरकारकडे प्रलंबित होता. आणखी वर्षभरच या पदावर राहता येणार असल्याने नवे सदस्य त्याबाबत फारसे उत्सुक नव्हते. त्यामुळे या पाचही जणांची त्यांच्या पदावर फेरनियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या चार महामंडळांचे उपाध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, तर सुरेश देशमुख हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले असले, तरी ते मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेचआहेत.