काँग्रेस नेते आ. वडेट्टीवारांचा आरोप

सिंचन घोटाळ्यात संघ परिवारातील भाजपच्या राज्यसभेतील खासदाराच्या बचावासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजीव जैन यांची वर्षभरातच बदली करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दबावामुळेच ही बदली झाल्याचेही ते म्हणाले.

प्रदेश कॉंग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे चंद्रपूर-गडचिरोली व नागपूर जिल्ह्य़ाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून आज वडेट्टीवार जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आल्यावर पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. सिंचन घोटाळ्यात बरेच मोठे राजकीय पुढारी, अधिकारी व कंत्राटदार गुंतलेले आहेत. पहिल्या एक ते चार क्रमांकाच्या आरोपींमध्ये तर भाजप व संघ परिवारातील लोकांचाच समावेश आहे. मात्र, पाचव्या क्रमांकाच्या आरोपींपासून ही कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत:ची स्वच्छ प्रतिमा राखायची असेल तर यांच्यावरही कारवाई करणे भाग आहे. याच घोटाळ्यातील राज्यसभेतील एका खासदारावर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून त्यांच्या बचावासाठी प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजीव जैन यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

गोंडवाना विद्यापीठ असो की, महामंडळ अथवा सरकारी वकील सर्वत्र कायद्याला डावलून अपात्र लोकांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. गोंडवाना विद्यापीठाची समिती तर उच्च न्यायालयाने बरखास्त करून तीन महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. वरोरा येथे सरकारी वकील म्हणून ज्या अ‍ॅड. देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तीही नियमबाह्य़ आहे. कायद्यानुसार सरकारी वकीलाचे वय ५५ वर्षांपेक्षा अधिक नको. मात्र, अ‍ॅड. देशपांडे यांचे ५५ वष्रे १२६ दिवसांचे वय झालेले असतांनाही ही नियुक्ती करण्यात आली आहे. संघ परिवारातील लोकांना विविध शासकीय समित्या, महामंडळ व विद्यापीठात पदे मिळावी म्हणून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.