अलिबाग – लहानपणापासून त्याला ट्रेकिंगची आवड होती. कधी मित्रांसमवेत तर कधी एकटाच वेळ मिळेल तसा तो ट्रेकिंगला जात होता. पण ट्रेकिंगची ही आवड कधी त्याच्या जीववर बेतेल असे त्याला वाटते नव्हते. निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त हिंडायचं हेच त्याच ध्येय होत. याच ध्येयाच्या पाठीमागे धावताना एक अपघात झाला आणि सारच संपलं…

भिवंडी येथील 26 वर्षाचा आकाश रामचंद्र वाघमोडे यांचा रायगड जिल्ह्यातील इरशाळगडावरून दरीत पडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी तो घरातून एकटाच ट्रेकिंग साठी बाहेर पडला होता. इरशाळगडावर पोहोचण्यापूर्वी दहा वाजता त्याने त्याच्या आईशी फोनवरून संपर्क केला होता. त्यानंतर त्याच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे सर्वच जण चिंतेत होते. खालापूर पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने आकाशचा शोध घेण्याच मोहीम सुरू केली होती.

मोबाईल लोकेशन मदतीने त्याचा शोध सुरू करण्यात आला. खोपोली येथील हेल्प फाउंडेशन चे सदस्य या मोहिमेत पोलिसांचा समवेत सहभागी झाले होते. त्याची गाडी इरशाळगडाच्या पायथ्याशी उभी होती. फोन वाजत होता. पण तो प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे सगळेच चिंतेत होते.
तीव्र उन्हात मदत व बचाव कार्य करणे आव्हानात्मक होते. मात्र पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तसेच हेल्प फाउंडेशनच्या सहकार्याने आकाश चा शोध सुरू केला. दुपारी तीनशे फूट खोल दरीत आकाशचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. प्रशिक्षित बचाव पथकांच्या मदतीने रात्री साडेआठच्या सुमारास मृतदेह पोलिसांनी दरीतून बाहेर काढला.

ट्रेकिंग दरम्यान तोल जाऊन तो दरीत कोसळला असावा, आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला असावा, असा अंदाज हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांनी व्यक्त केला आहे .खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
अनोळखी ठिकाणी एकट्यानेच ट्रेकिंग करणे टाळावे. स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये. आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे.

अशा दुर्घटना घडण्याची ही पहिली वेळ नाही, माणगाव तालुक्यातील कुंभे येथे पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील तरुणीचा इन्स्टाग्रामसाठी रिल करतांना दरीत पडून मृत्यू झाला. अन्वी कामदार असे या तरुणीचे नाव होते. कर्जत तालुक्यात एक किल्ल्यावर ट्रेकिंग साठी गेलेल्या पर्यटकांच्या संदर्भातही अशा दुर्घटना घडल्या आहेत.