मुंबईतल्या मीरा रोड या ठिकाणी एका तरुणाने दोन सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला केला आणि त्यांना गंभीर जखमी केलं. या दोघांशी त्याचा वाद झाला होता. त्यानंतर तुम्हाला कलमा पठण येतं का? तुमचा धर्म काय? हे विचारुन या तरुणाने हल्ला केला, या हल्ल्यात एका सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा हल्ला म्हणजे लोन वु्ल्फ अटॅक होता का? अशी शक्यता वर्तवली जाते आहे. कारण हल्लेखोर जैब झुबैर अन्सारीच्या घरात लोन वुल्फ अटॅक असं लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. लोन वुल्फ अटॅक म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ.
काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
मुंबईतल्या मीरा रोड या उपनगरातील नया नगर भागात वोक्हार्ट रुग्णालय आहे. त्या रुग्णालयाच्या मागे एका इमारतीचं बांधकाम सुरु आहे. २७ एप्रिलच्या पहाटे साधारण ४ च्या सुमारास जैब झुबैर अन्सारी हा तरुण या ठिकाणी पोहचला. त्याने सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा याच्याशी क्षुल्लक कारणावरुन हुज्जत घातली. त्यानंतर अचानक चाकू काढला आणि त्याच्यावर हल्ला केला. ज्यानंतर सुब्रतो सेन हा सुरक्षा रक्षक बचावासाठी धावला तेव्हा जैब अन्सारी नावाच्या तरुणाने त्याच्यावरही हल्ला केला. या घटनेनंतर तिथून त्याने पळ काढला. राजकुमार मिश्रा यांची प्रकृती गंभीर आहे. जैब झुबैर अन्सारीने तुला कलमा वाचता येतो का? नमाज पठण येतं का असं विचारून सुरक्षा रक्षकावर हल्ला केला होता. यावरुनच त्यांचा वादही झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच त्याच्याकडे ISIS, जिहाद अशी लिहिलेली नोटसुद्धा आढळली. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.

जैब झुबैद अन्सारीच्या घराच्या झडतीत काय सापडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अन्सारी एका कोचिंग क्लासमध्ये शिकवत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक केली आहे. तसंच या तरुणाने काही महिन्यांपूर्वी कोचिंगचं हे काम सोडलं होतं. ५ मे रोजी त्याने त्याचं मीरा रोड येथील घर रिकामं करावं असं त्याच्या घरमालकाने त्याला सांगितलं होतं अशीही माहिती समोर आली आहे. पोलिसांना आरोपीच्या घरी काही नोट्स मिळाल्या आहेत. जैब झुबैर अन्सारीच्या घरात पोलिसांना लोन वुल्फ अटॅक असा उल्लेख असलेली चिठ्ठीही सापडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अन्सारीच्या घरात नोट्स सापडल्या आहेत. यामध्ये ISIS, lone wolf, Jihad असे उल्लेख आहेत. इंडियन एक्स्प्रेसला एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जैब झुबैर अन्सारीने त्याचा मोबाइल फॉरमॅट केला आहे. मात्र हा फोन आम्ही ताब्यात घेतला आहे. तसंच हा लोन वुल्फ अटॅक होता का? याचेही तपशील आम्ही तपासत आहोत अशी माहिती दिली आहे. लोन वुल्फ अटॅक म्हणजे नेमकं काय? हे आपण समजून घेऊ.
लोन वुल्फ अटॅक म्हणजे काय?
‘लोन वुल्फ अटॅक’ म्हणजे एका व्यक्तीद्वारे करण्यात आलेला हिंसाचार किंवा तसंच हिंसक कृत्य.
लोन वुल्फ अटॅक करणारी व्यक्ती कुठल्याही दहशतवादी संघटनेच्या आदेशाशिवाय दहशतवादी ज्या प्रमाणे हल्ला करतात तसा हल्ला करते.
लोन वुल्फ अटॅक करणाऱ्या हल्लेखोराची विचारसरणी ही मोठ्या दहशवादी संघटनेपासून प्रेरित असू शकते, पण तो आपल्या धोरणांप्रमाणेच गोष्टी घडवून आणतो, हल्ले करतो.
लोन वुल्फ अटॅक करणाऱ्या हल्लेखोराचं किंवा दहशतवाद्याचं स्वरुप कसं असतं?
लोन वुल्फ अटॅक करणारा व्यक्ती, हल्लेखोर किंवा दहशतवादी हा कट्टरपंथी असतो. त्याला कुठल्याही दहशतवादी संघटनेकडून कुठलंही प्रशिक्षण मिळालेलं नसतं. पण तो ऑनलाइन किंवा व्यक्तिगत नेटवर्कच्या माध्यमातून अशा लोकांच्या संपर्कात येऊ शकतो.
लोन वुल्फ अटॅक करणारा व्यक्ती एकट्यानेच हल्ला घडवण्याचा कट सुनियोजितपणे आखतो. तो कट अंमलातही एकटाच आणतो. अशा प्रकारची योजना किंवा कट एकट्यानेच आखलेला असल्याने त्याबाबत ठोस अशी माहिती लगेच मिळवली जाऊ शकत नाही.
लोन वुल्फ अटॅक करणारा व्यक्ती चाकू, छोटी मिसाइल, स्फोटकं यांचा वापर करतो. अशा प्रकारची हत्यारं दहशतवादी संघटनांकडे नसतात. पण रोजच्या वापरात अशा गोष्टी जसं की चाकू किंवा धारदार हत्यारं सहज मिळू शकतात.
लोन वुल्फ अटॅक करणारा हल्लेखोर हा कुठल्याही दहशतवादी संघटनेशी संलग्न असेलच असं नाही, पण तो त्या संघटनेच्या विचारांशी जोडलेला असू शकतो.
ISIS शी संबंधित प्रपोगंडा व्हिडीओ बघत होता जैब झुबैद अन्सारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जैब झुबैद अन्सारी हा तरुण सोशल मीडियावर ISIS शी संबंधित प्रपोगंडा व्हिडीओज वारंवार बघत होता. तसंच सोशल मीडियावरही त्याने काही पोस्ट लिहिल्या आहेत. या तरुणाने धर्म विचारुन जो हल्ला केला त्यामागे त्याचा हेतू काय? याचा तपास आता पोलीस आणि महाराष्ट्र एटीएस यांच्याकडून घेतला जातो आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया नेमकी काय?
सेल्फ रॅडिकलायजेशनचं हे प्रकरण आहे. इंटरनेट, पुस्तकं या माध्यमातून हा आरोपी तयार झालेला दिसतो आहे. याला आपल्याला केवळ जिहाद करायचा आहे, म्हणजेच इतर धर्मीयांना मारायचं आहे या मानसिकतेतून त्याने हे कृत्य केलं आहे. याचं कुटुंब परदेशात आहे, हा आरोपीही परदेशात राहिला आहे. आधी तो कुर्ला या ठिकाणी आणि नया नगरला तो राहायला आला. या सगळ्या मागे कोण आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत.
