गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपासून त्यांनी बीड येथील सभेतून सूचक विधान केलं होतं. राजकारण गढूळ झालं आहे, मी तुरटीचं काम करेन, असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं. संबंधित विधानावर पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच त्या सध्या अस्वस्थ का आहेत? यावरही भाष्य केलं आहे.
गढूळ राजकारणाच्या विधानावर स्पष्टीकरण देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “ही सभा बीडमधील आहे. बीडमध्ये राजकीय वातावरण गढूळच आहे. बीड अस्वस्थ आहे. हा माझा जिल्हा आहे. येथे आमचा मुख्य शत्रू राष्ट्रवादी काँग्रेस होता. आता येथे प्रत्येकाला वाटतं माझं काय होणार? प्रत्येकजण माझ्याकडे येऊन तक्रार करतो. पण मी प्रत्येकाला वेगळं बोलू शकत नाही. त्यामुळे मी बीडमधील सभेतून लोकांना उद्देशून म्हटले, वातावरण गढूळ आहे, यात मी तुरटीचं काम करेन, तुम्ही काही चिंता करू नका. समोरच्या माणसाला आश्वस्त करणं नेत्याचं काम असतं. लोकांना आश्वस्त करणारा नेता हवाय अस्वस्थ करणारा नको.”
हेही वाचा- “मी दररोज बँकांच्या पाया पडतेय”, आर्थिक तंगीबाबत पंकजा मुंडेंनी मांडली व्यथा
भाजपात तुम्ही अस्वस्थ आहात का? असं विचारलं असता पंकजा मुंडेंनी पुढे सांगितलं, “मी भाजपात अस्वस्थ नाही. मी सध्या सामान्यपणेच अस्वस्थ आहे. कारण माझ्या परिस्थितीत इतर कुणालाही ठेवलं तर तो माणूस अस्वस्थ होईलच किंवा तो आणखी काय करेल? हे माहीत नाही. पण मी कणखरपणे उभी आहे.”
हेही वाचा- “…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान
“मी अस्वस्थ असताना कोणाताही निर्णय घेत नाही. मी फार जड आत्मा आहे. मी पटकन डगमगणारी नाही. मी अस्वस्थ आहे, कारण एकाचवेळी मी खूप गोष्टींकडे लक्ष देत आहे. अगदी घरापासून व्यावसायिक गोष्टी, राजकारणाकडे लक्ष देत आहे. मी ‘वन मॅन आर्मी’ आहे, म्हणून मी अस्वस्थ आहे,” असं भाष्य पंकजा मुंडेंनी केलं.