अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांची गृहमंत्रीपदी वर्णी लागली आहे. वळेस पाटलांनी पदभार हाती घेतल्यानंतर पोलीस प्रशासनातील ‘संघ’निष्ठ अधिकाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे? गुन्हेगारी संघटना आहे? आता पर्यंत देशातील सगळ्या अडचणींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशासाठी लढला, झिजला हे सांगायला तुम्ही लागत नाही दिलीप वळसे पाटील. हे सर्वसामान्यांना माहीत आहे त्यामुळे, तुमच्या राजकीय स्वार्थासाठी संघाला मधे आणू नका.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत पत्रकारपरिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “दिलीप वळेस पाटील यांनी असं म्हटलं आहे की कोण कोण अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबधित आहेत, हे आम्ही शोधून काढू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे? गुन्हेगारी संघटना आहे? गांधींच्या हत्येच्याबाबत देखील सर्व न्यायालयाने निकाल दिला की संघाचा गांधींच्या हत्येत हात नाही. त्यावेळी तर तुमचीच सरकारं होती. देशामध्ये करोना हे तर आताचं उदाहरण आहे, त्याशिवाय सगळ्या आक्रमणांमध्ये अडचणींमध्ये समाजासाठी कोण धावून आलं? लातूरचा भूकंप, कुठं पूर परिस्थिती की करोना असू दे, युद्ध झालं.. सगळ्या विषयांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशासाठी समाजासाठी झिजला, हे सांगायला तुम्ही लागत नाही, दिलीप वळसे पाटील. हे सर्वसमान्य माणसाला माहिती आहे. तुम्ही एक जबाबदार नेते आहात, माझं तुमच्यावर प्रेम आहे. पण तुम्ही तुमच्या राजकीय आवश्यकतेपोटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यात आणू नका. तुम्ही हे म्हणा की यातले कोण अधिकारी विरोधी पक्षाला माहिती पुरवतात, आता तुमची प्रशासनावर पकड नाही त्याला आम्ही काय करणार? पण त्याला संघाचं लेबल लावू नका आणि संघाचे शोधून तुम्ही काढताय, कायदा संपला आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही टोकाची राष्ट्रावर श्रद्धा असणारी समजावार प्रेम असणारी संघटना आहे. त्यामुळे तुमच्या वादामध्ये तुमच्या राजकीय हितासाठी संघाला मधे ओढू नका.”

“…तर संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणं गरजेचं”

तसेच, “नुकतेच राज्याचे गृहमंत्री झालेले दिलीप वळसे पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. परंतु माझं म्हणणं आहे की त्यांना बळीचा बकरा केला आहे. त्यांची अॅन्जीओप्लास्टी झालेली आहे. त्यामुळे ज्या प्रकारे गृहखात्यामध्ये आगामी काळात त्यांना भूमिका बजवावी लागणार आहे, हे ते कसं सहन करू शकतील हा प्रश्न आहे. मात्र हा त्यांच्या पक्षाचा व त्यांचा वैयक्तिक विषय आहे, मैत्री वेगळी व पक्ष वेगळा.” असं देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.