१४ वर्षापुर्वीच्या खटल्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शिराळा प्रथम वर्ग न्यायालयाने लागू केलेले अटक वॉरंट आज (शुक्रवार) इस्लामपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने रद्द केले. मात्र, खटल्याच्या सुनावणीसाठी दूरदृष्य प्रणालीद्बारे हजर राहण्याचे निर्देश दिले.
मुंबईमध्ये मराठी तरूणांना रेल्वेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १४ वर्षांपुर्वी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचे पडसाद शिराळा तालुक्यात उमटल्याने शिराळा पोलीस ठाण्यात राज ठाकरे, जिल्हा प्रमुख तानाजी सावंत यांच्यासह १० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्याची शिराळा न्यायालयात सुनावणी सुरू असताना, राज ठाकरे वारंवार सुनावणीसाठी अनुपस्थित राहात असल्याने न्यायालयाने अटक वॉरंट बजावले होते. सुनावणीवेळी राज ठाकरे यांच्या गैरहजेरीत वकिलांनी वॉरंट रद्द करण्याची केलेली मागणी, प्रथम वर्ग न्यायालयाने फेटाळल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात वकिलांनी धाव घेतली होती.

या प्रकरणी सुनावणी दरम्यान, राज ठाकरे यांना सुरक्षा व्यवस्था असल्याने त्याचा सरकारी यंत्रणेवर ताण येऊ शकतो, तसेच राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचा युक्तिवाद राज ठाकरे यांच्या वकिलांनी केला. या सुनावणीनंतर न्यायालयाने अटक वॉरंट रद्द करत असताना दूरदृष्य प्रणालीद्बारे सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले. राज ठाकरे यांच्यावतीने अ‍ॅड. विजय खरात व आनंदा चव्हाण यांनी बाजू मांडली.