प्रदीप नणंदकर

लातूर :  गेल्या दीड महिन्यांपासून लातूर शहरवासीयांना नळाद्वारे मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा रंग पिवळा झाल्यामुळे सामान्य नागरिक अस्वस्थ असताना काँग्रेस व भाजप एकमेकांवर आरोप करत आहेत, मात्र या आरोपातून प्रश्न सुटत नाही .

पाण्याचा रंग घालवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही तो रंग काही कमी होत नाही. नेरी नागपूर या संस्थेचे पथक लातुरात दाखल होणार असून ते सर्व पाहणी करून त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी सांगितले .लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणात शेवाळे अधिक झाले आहे. धरणातील पाणी कालव्यामध्ये सोडले जाणार असल्याने दोन दिवस लातूर शहराला पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी जाहीर केले आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा  ज्या ठिकाणाहून केला जातो ते पाणी अतिशय खोलवरून घेतले जाते. पंप वरच्या बाजूने उचलला तर खालचा गाळ पंपात कमी येईल त्यासाठीचे प्रयत्नही पालिकेकडून केले जात आहेत .

राज्यात अनेक शहरांना धरणातून पाणीपुरवठा होतो. उन्हाळय़ाच्या दिवसांत स्वाभाविकपणे शेवाळे विविध धरणांत तयार होतात. नेमके धणेगाव धरणातच असे कोणते शेवाळे तयार होते, की ज्यामुळे ते पिण्यास योग्य असत नाही याचाही खुलासा प्रशासनाने केला पाहिजे.  धरणात शेवाळे झाल्यामुळे पाणी पिण्यायोग्य असत नाही, हा दावा शास्त्रीय नाही.

जलशुद्धीकरण केंद्रात त्यावर प्रक्रिया केली तर पाणी शुद्ध होते. मात्र पाइपलाइनमधून पाणी लोकांना पोहोचते तेव्हा त्याचा रंग पुन्हा पिवळा होतो असे खुलासे प्रशासनाकडून केले जात असले तरी सामान्य लोकांना ते पटत नाहीत. पाणी पिण्यायोग्य आहे. फक्त तुरटीचा वापर करा. पाणी उकळून गाळून प्या, असे आवाहनही केले जात आहे. भाजपच्या वतीने ६ मे रोजी लातूर शहराला जो घाण पाणीपुरवठा केला जातो तो पाणीपुरवठा त्वरित सुधारावा यासाठी माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठय़ा संख्येने लोक सहभागी होते. काँग्रेस पक्षाच्या वतीने नळाला चांगले पाणी येत असताना त्या पाण्यामध्ये पिवळा रंग मिसळून भाजपने मोर्चा काढला असल्याची टीका करण्यात आली, मात्र त्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून मिळणारे पाणी हे अजूनही पिवळेच येत आहे. तो रंग घालवणे अजूनही शक्य होत नाही. हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी जे दगडगोटे, वाळू सतरा वर्षांपूर्वी वापरण्यात आले त्यावर वेळोवेळी देखभाल करण्यात आली नाही आणि त्यामुळेच अडचण निर्माण होत असल्याचे म्हटले जात आहे. या जलशुद्धीकरण केंद्रावर अभियंता, केमिस्ट, फिल्ट्रेशन ऑपरेटर असायला पाहिजेत. किमान प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध असायला हवा. मात्र महापालिकेकडून केवळ एकतृतीय श्रेणी कर्मचारी कायमस्वरूपी आहे. बाकी कंत्राटी लोक आहेत. कोणीही यासंबंधी प्रशिक्षित नाही. धक्कादायक बाब अशी की, या शुद्धीकरण केंद्रावर स्वयंचलित यंत्रणा गेल्या सात वर्षांपासून बंद आहे. मानवी शक्तीचा वापर करून तुरटी व अन्य रसायने वापरावी लागतात, त्यामुळे ते प्रमाण बिघडते. रात्रपाळीच्या वेळी त्याचा वापर होतोच असे नाही अन् त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण होण्यात या अडचणी आहेत. यावरती थेटपणे कोणी बोलत नाही. जलशुद्धीकरण केंद्रावर नेमकी काय स्थिती आहे हे पाहण्याची तसदी प्रशासनाच्या वतीने आजपर्यंत कोणीही घेतली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने योग्य कर्मचारीवर्ग नसल्यानेच पाणीपुरवठय़ाची समस्या दिवसेंदिवस उग्र बनत जात असल्याची टीका करण्यात आली, मात्र याबाबतीत सत्ताधारी मंडळीच्या वतीने कुठलाच खुलासा केला जात नाही. उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी नगरसेवक हे धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात. त्याची अंमलबजावणी प्रशासनाने करायची असते. गेल्या दीड महिन्यापासून नळाला पिवळे पाणी येते आहे. त्या पाण्याचा रंग बदलणेपासून शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रशासनाने नेमके काय केले हे लोकांना सांगण्याची गरज असल्याचे सांगितले. पाइपलाइनमधील रासायनिक प्रक्रियेमुळे पाणी पिवळे येत असल्याचे आरोग्य प्रयोगशाळेचे तज्ज्ञ अजित पवार यांनी सांगितले असून तुरटी टाकून लोकांनी पाणी वापरावे, असे त्यांनी म्हटले आहे. पाण्याला पिवळा रंग येण्याची शंभर कारणे असतील. नेमक्या कोणत्या कारणामुळे पाणी पिवळे येते आहे हे कारण सापडत नाही. शेवाळामुळे पिवळा रंग येण्याची शक्यता फार कमी आहे. धरणांमधील पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आल्यानंतर ते पाणी पुढील पाण्याच्या टाकीत जाईपर्यंत कसे जाते, लोकांपर्यंत जाताना पाइपलाइनमधून गळती आहे का, शहरातल्या गटारीचे पाणी जाते का, अशा विविध शक्यता आहेत. लातूर शहरातील औद्योगिक वसाहतीत धनेगाव धरणातून पाणीपुरवठा केला जातो, मात्र या पाण्यात पाण्याचा रंग पिवळा नाही. दरवर्षी फिल्ट्रेशन केले जाते. योग्य वेळी त्याची देखभाल दुरुस्ती केली जाते, त्यामुळे कोणतीही अडचण आली नसल्याचे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय कौसडीकर यांनी सांगितले. धरणात शेवाळे असल्यामुळे पाणी पिवळे येत असल्याचा दावा फोल असल्याचे यावरून सिद्ध होत आहे, कारण एमआयडीसीतील एकाही उद्योजकाने आत्तापर्यंत पाण्याच्या रंगाबद्दल तक्रार केलेली नाही.  शहरवासीय गेल्या दीड महिन्यापासून अतिशय अस्वस्थ व चिंतेत आहेत, मात्र याची दखल घेण्यासाठी कोणालाही वेळ नाही. प्रत्यक्ष धरणावर जाऊन जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन पाण्याच्या सर्व टाक्यांमध्ये लक्ष देण्यासाठी  अधिकाऱ्याला वेळ नाही. यामुळेच लातूरकरांना पुन्हा एकदा धरणात पाणी असूनही ते पिण्यायोग्य मिळत नाही.

निरी नागपूरचे पथक लवकरच दाखल होईल. त्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. पिवळय़ा पाण्याच्या प्रश्नाचा तडा लावून त्याचे निराकरण केले जाईल. 

– अमित देशमुख, पालकमंत्री, लातूर