महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला आज सात महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी २०२६ ला अजित पवार यांचा बारामती विमानतळावर विमान उतरत असताना अपघाती मृत्यू झाला. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळच विमानाला अपघात झाला. विमान खाली कोसळलं आणि विमानाने पेट घेतला. २८ जानेवारीच्या सकाळी पावणेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. अजित पवारांच्या मृ्त्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला. VSR या कंपनीच्या विमानाने अजित पवार प्रवास करत होते. आता याच VSR कंपनीबाबत आपण मोठा खुलासा पुराव्यांसकट करणार असल्याचं रोहित पवार यांनी जाहीर केलं आहे.
रोहित पवारांची पोस्ट नेमकी काय?
अजितदादांना जाऊन आज सात महिने पूर्ण झाले आहेत परंतु ना CID चा तपास पुढे सरकला ना CBI कडे तपास दिला गेला. साधा FIR सुद्धा नोंद झाला नाही, एवढेच नाही तर कर्नाटकात नोंद झालेला FIR देखील महाराष्ट्र सरकारने वर्ग केलेला नाही. VSR ला वाचवण्यासाठी एवढी धडपड कोण करतय ? का करतंय? हे सर्व ४ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यांसकट सविस्तर सांगेन. असं म्हणत रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे. आता रोहित पवार ४ सप्टेंबरला पत्रकार परिषदेत काय पुरावे सादर करणार आणि नेमके काय खुलासे करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर रोहित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा मृत्यू म्हणजे घातपात होता का? हे तपासण्यासाठी सीबीआय किंवा सीआयडी चौकशी करा ही मागणी करत पाठपुरावा केला आहे.
व्हीएसआर कंपनीला दिलेल्या १४५ कोटींबाबतही रोहित पवारांनी घेतला होता आक्षेप
‘व्हीएसआर’ विमान कंपनीला तीन महिन्यांत १४५ कोटी रुपये दिले आहेत. अपघाताच्या अगोदरच्या दिवशी १५.७२ कोटी रुपये. अपघाताच्या दिवशी ९.८१ कोटी रुपये आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी १६.८६ कोटी रुपयांचे बिल काढण्यात आले. सर्वसाधारण महिन्याला दहा कोटी रुपयांचे बिल निघत असताना जानेवारी ते मार्च महिन्यांत अचानक इतकी मोठी रक्कम का देण्यात आली हा प्रश्न रोहित पवारांनी याआधी उपस्थित केला होता. तसंच VSR कंपनीबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. आता ४ सप्टेंबरच्या पत्रकार परिषदेत के काय पुरावे सादर करणार ते पाहणं महत्त्वाचं असेल.
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांबाबत काय म्हणाले होते रोहित पवार?
अजितदादांच्या अपघातानंतर १८ व्या दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारी २०२६ रोजी एक पत्र अजितदादांच्या पक्षाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव अशा तीन लोकांच्या सह्या होत्या. या पत्रामुळेच सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला संबंधित पत्र लिहिल्याचे रोहित पवार म्हणाले होते.
