सांगली : विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज निर्णायक भूमिका बजावणार असून कोणाला पाडायचे आणि कोणाला विजयी करायचे हे ठरले असल्याचे ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी सांगलीत मेळाव्यात सांगितले.
ओबीसी समाजाची संघटनात्मक बांधणी आणि भविष्यातील ओबीसी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी हरिप्रिया मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीत हाके बोलत होते. यावेळी समन्वयक संजय विभुते, माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक विष्णू माने, सविता मदने, कविता कोळेकर, राजेंद्र कुंभार, विठ्ठल खोत, जगन्नाथ माळी आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा – सांगलीत गणेशाचे थाटात आगमन; ध्वनिक्षेपकांच्या भिंती, ढोल-ताशांच्या निनादात मिरवणुका
यावेळी बोलताना प्रा. हाके म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य असणाऱ्या ओबीसी समाजाला वेगवेगळ्या पक्षांतून किती उमेदवारी मिळते, हे आम्ही पाहत आहोत. योग्य प्रतिनिधित्व मिळाले तरच आमचा पाठिंबा असेल अन्यथा, ओबीसींनी कोणाला मत द्यायचं आणि कोणाला पाडायचं हे ठरवले असून ओबीसी पहिल्यांदा ओबीसी एससी एसटी आणि अल्पसंख्यांकांना मतदान करेल. ओबीसींनी पाडायचं कोणाला त्याची यादी निश्चित केली आहे.
दरम्यान काँग्रेसचे देशाचे नेते राहुल गांधी ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी असे म्हणतात आणि त्यांचेच नेते महाराष्ट्रात एक शब्दही बोलायला तयार नाहीत. या दुहेरी भूमिका घेणाऱ्या नेत्यांविषयी तसेच त्यांनी काँग्रेस कशी संपवली याविषयी पुढील आठवड्यात राहुल गांधी यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत आपण बोलणार असल्याचेही प्रा. हाके यांनी सांगितले.