Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. अजित पवारांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू होईल ही कल्पनाही कुणी केली नसेल. मात्र ही घटना घडल्यावर महाराष्ट्र हळहळला. दरम्यान अजित पवारांचा अपघाती मृत्यू होण्यामागे काही घातपात आहे का? असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. प्रश्नही उपस्थित केले आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या मागणीनंतर हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

सुनेत्रा पवारांच्या मागणीनंतर देवेंद्र फडणवीस अमित शाह यांची भेट घेणार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजितदादांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली. अजित पवारांचा अपघात हा साधासुधा नाही, त्यामुळे या प्रकरणी सीबीआयमार्फत तपास केला जावा अशी मागणी करण्यात आली. ज्यानंतर ही मागणी घेऊन आपण अमित शाह यांना भेटणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

सुनील तटकरेंनी माध्यमांना काय सांगितलं?

सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात जे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांना माहिती दिली की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे ही मागणी आम्ही केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला याबाबत आश्वासन दिलं आहे की ते ही मागणी घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. तसंच स्वतः मुख्यमंत्रीही याबाबतची विनंती अमित शाह यांच्याकडे करणार आहेत. अजितदादांचा अपघाती मृत्यू ही काही साधीसुधी घटना नाही. यासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकांनाही या प्रकरणात घातपाचा संशय वाटतो आहे. त्यामुळे सीबीआय चौकशी केली जावी आणि जे काही घडलं आहे ते सत्य लोकांसमोर यावं अशीही मागणी करण्यात आली आहे.

सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात जे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं त्यात काय उल्लेख आहेत?

१) अजित पवारांचा अपघाती मृत्यू हा लोकांना घातपाचा प्रकार वाटतो आहे. त्या अपघाताबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. माध्यमांमधूनही हे प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे.

२) सदर अपघात प्रकरणाची सीबीआय चौकशी केली गेली पाहिजे. अपघात कसा झाला? नेमकं काय काय घडलं? घटनाक्रम काय होता? वैमानिक का बदलण्यात आला? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत आणि सगळे पैलू सीबीआयने तपासले पाहिजेत. यामागे जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे.

३) अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, त्यांचा अपघाती मृत्यू होणे ही साधीसुधी घटना नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत केली जावी आणि त्याचा अहवाल जनतेसमोर यावा. अशा तीन प्रमुख मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केल्या आहेत.