केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे आगामी काळात स्पष्ट होणार – नाना पटोले

भाजपाच्या पिलावळीला आता लोक त्यांची जागा दाखवणार. असंही म्हणाले आहेत.

Congress-Nana-Patole
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (संग्रहित छायाचित्र)

“ केंद्र सरकार तपास यंत्रणा, आय़एएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा ज्या पद्धतीने वापर करत आहे. ते अनेक गोष्टींमधून दिसून आलं आहे. परमबीर सिंगला देखील बाहुलं बनवून त्यांनी वापर केला. परमबीर सिंग कुठं गेला पत्ता नाही. अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा वापर करण्याचा काम केंद्रात बसलेलं भाजपाचं सरकार करत आहे. तसच समीर वानखेडेचा देखील वापर केलेला आहे आणि हे उद्याचा काळात स्पष्ट होणार आहे.” असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. यावर बोलताना पटोले म्हणाले की, “काँग्रेसमधील एकाही मंत्र्यावर ते आरोप करू शकत नाही व सिद्ध देखील करू शकत नाही. छगन भुजबळांवर असेच आरोप करून अडीच वर्षे तुरूंगात ठेवलं. उच्च न्यायालायाने ते निर्दोष असल्याचं सांगितलं. त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल होऊ शकले नाहीत. या पद्धतीचे खोटे आरोप करून राजकारण करणारी जी भाजपाची पिलावळ आहे, त्याला आता लोक त्यांची जागा दाखवणार. काँग्रेसवर आरोप केले तर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत, आता कारवाईला आम्ही देखील तयार आहोत.”

पेट्रोल किमान ६० रुपये प्रति लिटरमागे कमी केले पाहिजे –

तसेच, “भाजपाला देशभरात झालेल्या पोटनिवडणुकात जे अपयश आलं, त्यावर हिमाचलच्या भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, केंद्र सरकारने जी महागाई वाढवली. त्याचे परिणाम हे आहेत की आमच्या सर्व जागा हरल्या. मागील दोन वर्षांपासून आम्ही त्यांच्याशी भांडतोय की डिझेल-पेट्रोल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी असताना, तुम्ही ही दरवाढ केली. ७० टक्क्यांनी त्यांनी दरवाढ केली होती. पाच-दहा रुपयांनी कमी करून फार काही उपकार केलेले नाहीत. किमान ६० रुपये प्रति लिटरमागे कमी केले पाहिजेत. हा दिखावा आहे, यामुळे लोकांना लुटण्याची जी मानसिकता होती, ती स्पष्ट झाली. म्हणून लोकांनी आता असा निर्णय केलेला आहे की महागाई जर कमी करायची असेल तर भाजपाला सत्तेपासून दूर करा. राज्य सरकारची जी भूमिका आहे, ती काही दिवसात राज्य सरकार देखील याबाबत विचार करेल आणि राज्य सरकारचे जे काही थोडेफार कर आहेत, ते कमी केल्या जातील.” असंही नाना पटोलेंनी सांगितलं.

परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं –

“केंद्रात बसलेलं भाजपाचं सरकार राज्यातील महाविकासआघाडी सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी सुरूवातीपासून प्रयत्न करत आहे. जेव्हा बिहारच्या निवडणुका आल्या तर सुशातसिंह राजपूतचा विषय काढून तेथील ठाकूर लोकांची मत मिळवण्यासाठी प्रयत्न केला. त्यामध्ये ते यशस्वी झाले. पण पुन्हा त्यांनी अनिल देशमुख, परमबीर सिंग, समीर वानखेडे प्रकरण, ड्रग्जचे मुद्दे, आर्यन खान प्रकरण पुन्हा हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करणं आणि राज्यातील सरकारला खाली पाडणं आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं ठरवून भाजपा हे काम करत आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, परमबीर सिंग यांचं शेवटचं जे लोकेशन आहे. ईडीने सांगितलं की अहमदाबादमध्ये त्यांचं शेवटचं लोकेशन मिळालं. त्यानंतर परमबीर सिंग कुठं गेले? अजुन आम्हाला दिसले नाहीत. याचाच अर्थ गुजरातमधुन परमबीर सिंग गायब झाले. त्यांना बेपत्ता करण्याचं काम केंद्रात बसलेल्या भाजपाच्या मोदी सरकारने केलेलं आहे. आमची एवढीच मागणी आहे की, ज्याने आरोप केले. आरोप करणारा माणूसच बेपत्ता आहे. तर वास्तिविकता काय हे लोकांच्या समोर आणलं पाहिजे. अनिल देशमुखच्या प्रकरणात सूड बुद्धीने हे कारवाई केलेली आहे, अशी काँग्रसेची भूमिका आहे.” असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.

“देश वाचावायचा असेल, संविधान वाचावायचं असेल तर काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही मागून वार करणारे नाही. आम्ही जे आहे ते समोरून करू, लोकाशाही पद्धतीने पुढे जाऊ ही भूमिका काँग्रेसने मांडलेली आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: It will be clear in the near future that the central government also used sameer wankhede nana patole msr

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या