पुण्यातल्या कसबा मतदार संघातल्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. कर्करोगाशी त्यांची सुरू असलेली झुंज अखेर संपली. त्यानंतर आता या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. जेव्हा एखाद्या आमदाराचं निधन होतं त्यावेळी खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. तसंच शक्यतो जो आमदार गेला आहे त्या आमदाराच्या घरातल्या सदस्याला तिकिट दिलं जातं असे राजकारणातले दोन अलिखित संकेत आहेत. मात्र मुक्ता टिळक यांचे पती शैलेष टिळक यांना भाजपाने तिकिट दिलेलं नाही. त्यामुळे त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही कारण महाविकास आघाडीनेही या ठिकाणी उमेदवार दिला आहे.
काय म्हणाले शैलेष टिळक?
भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. अर्ज भरण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते दाखल झाले होते. यामध्ये शैलेष टिळक यांचा सहभाग नव्हता. यानंतर शैलेष टिळक म्हणाले की आम्ही आधीही भूमिका मांडली आहे. पक्षाने जर आमच्या घरात तिकिट दिलं असतं तर बरं झालं असतं. कारण ते झालं असतं तर मुक्ता टिळक यांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली असती. मुक्ता टिळक यांना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरली असती. पण ठीक आहे पक्षाने विचार करून निर्णय घेतला असावा त्यामुळे आम्ही त्या निर्णयाला विरोध करत नाही असंही शैलेष टिळक यांनी म्हटलं आहे. आम्ही पक्षाच्या विरोधात जाणार नाही. पक्षासोबत राहणार असंही शैलेष टिळक यांनी म्हटलं आहे.
मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांनी काय म्हटलं आहे?
पक्षाने जो निर्णय घेतला त्यामुळे ब्राह्मण समाज नाराज आहे असं वाटतंय का हे विचारलं असता कुणाल टिळक म्हणाले की सोशल मीडियावर आणि डिजिटल मीडियावर अशा प्रतिक्रिया येत आहेत. पण भाजपाने निर्णय घेतला आहे. त्याच निर्णयाचं आम्ही पालन करतो आहोत ते प्रत्येकाने करायला पाहिजे. नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड आणि सेल्फ लास्ट असा भाजपाचा मंत्र आहे त्याचा विचार प्रत्येकानेच करायला पाहिजे असं कुणाल टिळक यांनी म्हटलं आहे. आम्हीही याच उद्देशाने पुढे जाऊ. भाजपाने जो निर्णय घेतला त्याच्या पाठिशी आम्ही आहोत.
मुक्ता टिळक यांना जाऊन एक महिना झाला आहे. पण घडामोडी अत्यंत वेगाने झाल्या. आम्हाला यातून थोडं बाहेर यायला वेळ लागेल. आम्ही पक्षाच्या विरोधात जाणार नाही असं मुक्ता टिळक यांचे पती शैलेष टिळक यांनी म्हटलं आहे. आमची जी भूमिका होती ती पक्षाच्या नेत्यांना सांगितली आहे. आम्ही पक्षाच्या विरोधात जाणार नाही असंही शैलेष टिळक यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शैलेष टिळक यांनी हे वक्तव्य केलं आहे.