पावसाळा सुरू होऊन पेरण्या केल्या जात असतानाही अद्याप खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना कर्ज वितरण होत नाही. शेतकऱ्यांना पुन्हा सावकारांच्या दारात पाठवणार आहात का? असा खडा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोल्हापूर येथे उपस्थित केला. यावेळी त्यांनी राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप होत नसल्याबद्दल, राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

राज्यात पावसाळा सुरू होऊन पीक कर्ज वाटप होत नसल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी भाजपाकडून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली “ कर्जमाफी करा, द्या पीक कर्ज ” असे म्हणत आंदोलन करण्यात आले.

यावेळी आमदार पाटील म्हणाले, शेतकऱ्याना २ लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मोठ्या धडाक्यात मुख्यमंत्र्यांनी केली. नियमित कर्ज भरणाऱ्याना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देवू असेही सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी तर ३ महिन्यात कर्जमाफी दिली नाही, तर नाव बदलवू अशी देखील घोषणा केली. विधानसभेत बाके वाजली. अभिनंदन करून घेतले. अनेक मंत्र्यांनी गळयाच्या शिरा तुटेपर्यंत अभिनंदनाची भाषणे केली. शेतकऱ्यांना आशा होती, खरिपाच्या कर्जासाठी मार्ग मोकळा होईल. पण सहा महिने झाले, तरी १८ लाख शेतकऱ्यांच्या नावाची यादीच आली नाही.२२ मे रोजी महाराष्ट्र शासनाने आदेश काढला. शासनाजवळ निधी नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात शासन राक्कम भरू शकत नाही, याची कबुली देवून ‘ शासनाच्या नावे कर्ज मांडावे ’ असे उधार आदेश दिले. बँकांनी २२ मे २०२० च्या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली. राष्ट्रीयाकृत बँकां शेतकऱ्याना पीककर्जासाठी दारातही उभे करत नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शासन आदेश पालनाचे ठरावाच घेतलेले नाही. त्यामुळे कर्जवितरण संपूर्णतः थांबलेले आहे.

तसेच, महाविकासआघाडी मध्ये समन्वय नसल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, असा आरोप आमदार पाटील यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी ‘कर्जवितारणाबाबत तक्रारी नकोत’ असे सांगितले होते. मात्र, या फुकाच्या डरकावणीला सुद्धा बँका दाद देत नसल्याचे सांगत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या आंदोलनात भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे , जिल्हा ग्रामीण अध्यक्ष समरजीतसिंह घाडगे भगवान काटे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.