रत्नागिरी : खेड जगबुडी पूल येथे रविवारी भीषण अपघात घडूनही मोठी जीवितहानी थोडक्यात टळली. मुंबई-गोवा महामार्गावरील या पुलावर वेगाने धावणाऱ्या मालवाहू कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट दुभाजक तोडून दोन पुलांच्या मधील जागेत अडकला.

गोव्याहून मुंबईकडे येत असलेला हा कंटेनर पुलाच्या संरचनेत अडकून राहिल्याने तो सुमारे २०० फूट खोल जगबुडी नदीपात्रात कोसळण्यापासून बचावला. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

खेड तालुक्यातील भरणे नाका परिसरात हा अपघात घडला. जुन्या आणि नव्या पुलांच्या मधोमध कंटेनर अडकून राहिल्याने तो कोणत्याही क्षणी खाली कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन मोठ्या क्रेनच्या साहाय्याने युद्धपातळीवर बचावकार्य राबविण्यात आले. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनंतर कंटेनर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून, अन्य कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. बचावकार्यादरम्यान एक मार्गिका बंद ठेवावी लागल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळाने वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. विशेष म्हणजे, याच पुलावर आठवडाभरात घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.