नांदेड: उच्च पदावरील व्यक्तींसोबत काम केलेल्या बर्याच अधिकार्यांचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध निर्माण होतात. अशाच संबंधातून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नांदेडहून दीडशे कि.मी. अंतरावरील वझरा (बु.) हे गाव गाठत आपले माजी एडीसी श्रीकांत येईलवाड व त्यांच्या परिवाराची मंगळवारी सांत्वनपर भेट घेतली. येईलवाड यांचे वडील जगन्नाथ येईलवाड यांचे काही आठवड्यांपूर्वी निधन झाले होेते. यानिमित्ताने झालेल्या नांदेडच्या खाजगी दौर्यात त्यांनी अन्य कोणाचीही भेट घेतली नाही, असे सांगण्यात आले.
वर्षभरापूर्वी उप राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देऊन काही काळ अज्ञातवासात गेलेले धनखड नंतर बरेच महिने चर्चेमध्ये राहिले. त्यांच्या राजीनाम्याची संसदेमध्येही बरीच चर्चा झाली. घटनात्मक पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर नवी दिल्लीत वास्तव्यास असलेले धनखड २०१९ ते २०२२ या काळात पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी श्रीकांत येईलवाड हे धनखड यांचे एडीसी होते. या काळात त्यांची येईलवाड यांच्या परिवाराशीही ओळख झाली. त्यांचे वडील जगन्नाथ येईलवाड हे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत वन परिक्षेत्र अधिकारी होते. अलीकडे त्यांचे निधन झाल्याची माहिती धनखड परिवारास कळाल्यानंतर येईलवाड कुटुंबातील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी माजी उपराष्ट्रपती येेथे आले होते.
माजी उपराष्ट्रपतींना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे त्यांच्या नांदेड दौर्याची पूर्वकल्पना जिल्हा व पोलीस प्रशासनाकडे आधीच प्राप्त झाली होती. त्यानुसार गेल्या सोमवारी सायंकाळी धनखड व त्यांच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड यांचे हिंडन (गाझियाबाद)-नांदेड या प्रवासी विमानाने येथे आगमन झाले. प्रशासनाने त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था येथील मिनी सह्याद्री विश्रामगृहाच्या प्रेसिडेंट सूटमध्ये केली होती. आवश्यक तो बंदोबस्त व डॉक्टरांचे पथकही या दरम्यान तैनात करण्यात आले होते. सोमवारी नांदेडमध्ये आगमन झाल्यानंतर धनखड दाम्पत्याने स्थानिक गुरुद्वारास भेट देऊन दर्शन घेतले.
मंगळवारी सकाळी जगदीप धनखड यांनी किनवट तालुक्यात असलेल्या वझरा (बु.) या गावाकडे मोटारीने प्रयाण केले. त्यांच्या ताफ्यात अन्य वाहनेही होती. या गावाला जाण्यासाठी माहूरमार्गे सोयीचे असल्याचे लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने आधीच तसे नियोजन केले होते. वझरा गावी पोहोचल्यावर त्यांनी श्रीकांत येईलवाड आणि त्यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. जगन्नाथ येईलवाड यांच्या निधनास सव्वा महिना पूर्ण झाल्यानिमित्त परिवाराने एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेथे तासभर उपस्थित राहून धनखड दाम्पत्य पुन्हा नांदेडला परतले. सायंकाळी ते गोवा-नांदेड-नागपूर या प्रवासी विमानाने नागपूरला आणि तेथून दिल्लीला रवाना झाले.
नांदेडमधील अशोक चव्हाण आणि डॉ.अजित गोपछडे या राज्यसभा सदस्यांना धनखड यांनीच खासदारकीची शपथ दिली होती; पण त्यांच्या दौर्यादरम्यान हे दोन्ही खासदार नांदेडमध्ये नव्हते. भाजपाच्या अनेक स्थानिक नेत्यांना माजी उपराष्ट्रपतींच्या नांदेड दौर्याची पूर्वकल्पनाच नव्हती, असे दिसून आले. त्यामुळे या पक्षातर्फे कोणीही त्यांच्या भेटीसाठी विश्रामगृहाकडे आले नाही. किनवटचे भाजपा आमदार भीमराव केराम हे मात्र उपराष्ट्रपतींच्या वझरा भेटीप्रसंगी येईलवाड यांच्या निवासस्थानी उपस्थित होते.
