रत्नागिरी: कोकणातील काजू, हापूस आंबा आणि मत्स्य उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जयगड बंदराची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, निर्यात प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने आणि समन्वयातून राबवाव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
मंत्रालयात मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या प्रादेशिक संचालक प्रीती चौधरी, जेएसडब्ल्यू पोर्टचे दिलीप शेट्टी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप तसेच बंदरे, परिवहन आणि महाराष्ट्र सागरी मंडळासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोकणातील शेतकरी आणि मत्स्य व्यवसायिकांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जयगड बंदरातून निर्यात व्यवस्था सक्षम करणे आवश्यक असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. कृषी व मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी शीतसाखळी, तपासणी प्रक्रिया, वाहतूक साखळी आणि बंदरांमधील आधुनिक सुविधा उभारण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर काजू व हापूस आंब्याचे उत्पादन होते. कोकणातील हापूस आंब्याला जागतिक स्तरावर विशेष मागणी असून मत्स्यव्यवसायही येथील अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असल्याचे मंत्री राणे यांनी नमूद केले. त्यामुळे निर्यात प्रकल्पाचे काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
शेतकरी आणि मत्स्य व्यवसायिकांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळण्यासाठी निर्यात व्यवस्था अधिक सक्षम होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करत, आवश्यक पायाभूत सुविधा प्राधान्याने उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिले. निर्यात प्रक्रियेत कोणताही अडथळा राहू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
काजू उत्पादक, हापूस आंबा उत्पादक आणि मत्स्य व्यवसायिकांमध्ये या प्रकल्पाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या. कोकणातील उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल आणि संपूर्ण कोकणाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
