रत्नागिरी : इराकमधून पाकिस्तानकडे निघालेले एलपीजी वाहतूक करणारे ‘आमिर गॅस’ हे जहाज अचानक मार्ग बदलून जयगड बंदराच्या दिशेने आणल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात जहाजाचा कप्तान आणि व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीविरोधातच दुसऱ्या भागीदार मालकाने बेकायदेशीर हालचालींचा आरोप करत अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आमिर गॅस’ हे जहाज इराकमधील खोर अल झुबेर बंदरातून पाकिस्तानातील बिन कासिम बंदरासाठी रवाना झाले होते. दुबईस्थित झांग यूनियन इंटरनॅशनल एलएलसी एफझेड या निर्यातदार कंपनीने पाकिस्तानातील अल पेट्रो गॅस प्रा. लि., लाहोरसाठी एलपीजी गॅसचा कार्गो लोड केला होता. मात्र नियोजित प्रवासादरम्यान जहाजाचा मार्ग बदलण्यात आल्याने संशय निर्माण झाला आहे.

दरम्यान, जहाजावरील एलपीजी गॅस जयगड येथील जेएसडब्ल्यू बंदरात उतरवण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली झाल्याचे समोर आले आहे. यासाठी ऍटलांटिक ग्लोबल शिपिंग या एजंटमार्फत सीमाशुल्क व बंदर प्राधिकरणाकडे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली होती. तसेच जहाजाला जयगडमधील एलपीजी जेटीला लावण्याचे नियोजनही करण्यात येत होते.

या घडामोडींविरोधात जहाजाचे भागीदार मालक फतेह मरीन आयएनसी यांनी १८ एप्रिल २०२६ रोजी आक्षेप नोंदवत कायदेशीर नोटीस बजावली आहे. वकील आश्विन शंकर यांच्या माध्यमातून जेएसडब्ल्यू जयगड बंदर, महासागर वाहतूक महासंचालनालय (डी. जी. शिपिंग), सीमाशुल्क विभाग, पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

यानंतर फतेह मरीन आयएनसीने रत्नागिरीतील युनिक मरीन एजन्सीला अधिकृत एजंट म्हणून नियुक्त केले असून, एजन्सीचे प्रतिनिधी सहल कर्लेकर संबंधित विभागांसमोर कंपनीची बाजू मांडत आहेत. पाकिस्तानात जाणारे जहाज अचानक जयगडकडे वळवण्यात आल्यामुळे या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहिले जात आहे. आता महासागर वाहतूक महासंचालनालय, बंदर प्राधिकरण, सीमाशुल्क विभाग आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणा यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.