MNS vs Jain Monk Controversy : मुंबईतल्या घाटकोपर येथील पांढऱ्या पट्टीवरून सुरू झालेला वाद शनिवारी दादरपर्यंत पोहोचला. दादर परिसरातील गोखले मार्गावरही पांढऱ्या पट्ट्या काढण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली. त्या संदर्भात मनसैनिकांनी शनिवारी दुपारपर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर त्यापूर्वीच प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून पांढऱ्या पट्ट्या हटवण्याची कारवाही केली. त्यावरून जैन समाजाचे धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मनसेला खुले आव्हान दिले.

नेमके काय म्हणाले निलेश मुनी?

‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलताना निलेश चंद्र मुनी यांनी पांढऱ्या पट्ट्या हटवण्याच्या मनसेच्या भूमिकेवर टीका केली. घाटकोपर आणि दादर येथील जैन धर्माच्या पांढऱ्या पट्ट्यावरून मनसेला धोका वाढतो. हिंमत असेल तर त्यांनी मुंब्रा, भिवंडी येथे जाऊन दाखवावे, पण तिथे ते जाणार नाही. सध्या संपूर्ण मुंब्रा हिरवा झालेला आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा कुठेही दिसून येत नाही. मग मनसैनिक मुंब्य्राचा रंग भगवा करायला कधी जाणार, तुमच्यात हिंमत आहे का, असा प्रश्न निलेश मुनी यांनी उपस्थित केला. मनसेला आम्ही वेळेवर उत्तर देणार… मनसे नेते संदीप देशपांडे यांना आई तुळजाभवानी सद्बुद्धी देओ. दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करू नका, असा इशाराही निलेश मुनी यांना दिला.

संदीप देशपांडे यांचे प्रत्युत्तर काय?

घाटकोपर आणि दादर येथे पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांना माझे आव्हान आहे की, हिंमत असेल तर त्यांनी एकदा मुंब्रा – पायधुनीत जाऊन पांढऱ्या पट्ट्या मारून दाखवाव्यात. आम्ही आंदोलन करून दाखवले आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही करून दाखवा. असले फुकटचे सल्ले आणि आव्हानं देणे निलेश मुनी यांना शोभत नाही, असे प्रत्युत्तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिले. मुळात धर्माच्या नावावर काय करायचे आणि काय नाही करायचे याचे ज्ञान त्यांना नाही. प्रत्येकाचा धर्म हा त्यांच्या चार भितींमध्ये असला पाहिजे, रस्त्यावर नाही आणि तीच गोष्ट पट्ट्यांच्याही बाबतीत आहे, असेही त्यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

वाद नेमका कसा उफाळून आला?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांचे दादरमधील गोखले मार्गावर जनसंपर्क कार्यालय आहे. कार्यालयापासून काहीच अंतरावर जैन धर्मियांचे देरासर असून त्या भागातील रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या होत्या. ही बाब समजताच संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. शनिवार, दुपारी ३ पर्यंत संबंधित पट्ट्या पुसाव्यात, अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा देशपांडे यांनी प्रशासनाला दिला. त्यांनतर प्रशासनाने तातडीने पट्ट्या पुसण्याची कार्यवाही हाती घेतली. दरम्यान, जैन धर्मीयांची ही पांढरी पट्टी म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. मनसेने दुपारी ३ पर्यंतची वेळ प्रशासनाला दिली होती. मात्र, त्यापूर्वीच प्रशासनाने आमच्या इशाऱ्याची दखल घेतली, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

“आम्हीही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत”

पांढऱ्या पट्टीच्या वादावरून जैन समाजाचे धर्मगुरू निलेश चंद्र मुनी हेदेखील आक्रमक झाले. कोणत्याही धर्मचा अपमान करणे, कोणत्याही धर्मावर बोट दाखवणे हे कायद्याविरोधात आहे. संदीप देशपांडे यांनी दोन धर्मांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. जैन समाज शांतीप्रिय आहे. पांढरा रंग शांततेचे प्रतिक आहे. जैन समाजाने बांगड्या भरलेल्या नाहीत. वेळ आल्यावर तुम्हाला उत्तर दिलं जाईल. संदीप देशपांडे जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसवाल्यांनी संदीप देशपांडे यांना सुपारी दिली आहे, असा आरोप मुनी यांनी केला. मुंब्रामध्ये एमआयएमची नगरसेविका म्हणते मुंब्रा हरा कर दुंगी त्याला तुम्ही विरोध करा, तुम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.