Jain Monk White Strip Controversy : काही दिवसांपूर्वी विद्याविहार येथील एका इमारतीसमोर जैन समाजासाठी पांढरी पट्टी आखण्यात आली होती. यासंदर्भात युट्यूबर आणि इन्फ्लुअन्सर प्रसाद वेदपाठक याने आवाज उठवल्यानंतर या वादात मनसेनेही उडी घेतली. आता हे प्रकरण दादरपर्यंत पोहोचलं असून दादरच्या गोखले मार्गावरही पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेऊन त्यांनी अल्टिमेटम दिला होता. दरम्यान, यावरून आता जैन समाजाचे धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी टीव्ही ९ ला प्रतिक्रिया दिली.

जैन समाज शांतीप्रिय

निलेश चंद्र मुनी म्हणाले, “कोणत्याही धर्मचा अपमान करणे, कोणत्याही धर्मावर बोट दाखवणं हे कायद्याविरोधात आहे. संदीप देशपांडे यांनी दोन धर्मांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. जैन समाज शांतीप्रिय आहे. पांढरा रंग शांततेचे प्रतिक आहे.”

जैन समाजाने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत

पुढे ते म्हणाले, “जैन समाजाने बांगड्या भरलेल्या नाहीत. वेळ आल्यावर तुम्हाला उत्तर दिलं जाईल. संदीप देशपांडे जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसवाल्यांनी संदीप देशपांडे यांना सुपारी दिली आहे.

यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचाही उल्लेख केला. “संदीप देशपांडे हे बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत. तुम्हाला जर खरंच वाटत असेल तर तुम्ही मुंब्रा, भेंडी बाजार, पायधुनीला; जा तिथे ज्याप्रकारे ईदच्या दिवशी किंवा नमाज पडताना रस्त्यावर पांढरे घालून बसतात त्याला विरोध करा”, असं आव्हानच त्यांनी केलं. “मुंब्रामध्ये एमआयएमची नगरसेविका म्हणते मुंब्रा हरा कर दुंगी त्याला तुम्ही विरोध करा, तुम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका”, असं ते एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

विद्याविहारमध्ये घडलेल्या घटनेप्रमाणेच दादरमध्येही गोखले मार्गावर पांढरी पट्टी मारण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांचे दादरमधील गोखले मार्गावर जनसंपर्क कार्यालय आहे. कार्यालयापासून काहीच अंतरावर जैन धर्मियांचे देरासर असून त्या भागातील रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या होत्या. ही बाब समजताच संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. शनिवारी दुपारी ३ पर्यंत संबंधित पट्ट्या पुसाव्यात, अन्यथा आम्ही मनसे स्टाइलने उत्तर देऊ, असा इशारा देशपांडे यांनी प्रशासनाला दिला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पट्ट्या पुसण्याची कार्यवाही हाती घेतली आहे.