Jain Muni Nayan Padmasagar Controversy: “महाराणी ताराराणी जैन होत्या”, असा अजब दावा करुन जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना पद्मसागर यांनी केवळ ताराराणी यांच्याबद्दलचे नवे तर महात्मा गांधी, राणी कुरमा देवी आणि आरएसएस बाबत देखील काही आश्चर्यकारक दावे केले आहेत. ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन पद्मसागर मुनी यांच्यावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून टीकाही झाली. पद्मसागर यांनी भाषणात कोणते दावे केले? कोणी काय टीका केली? गेल्या दोन दिवसात या प्रकरणाशी निगडीत घडलेल्या घडामोडींचा आढावा.

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर नेमकं काय म्हणाले?

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी, “जगातील अनेक विचारधारा स्त्रियांमध्ये आत्मा मानत नाहीत, परंतु जैन धर्माने स्त्रीला सन्मानाचे स्थान दिले आहे. एक स्त्री संस्कारी असेल, तर संपूर्ण कुटुंब, समाज आणि पर्यायाने संपूर्ण देश संस्कारी होतो. देशाची प्रगती ही संस्कारांवर अवलंबून असते. या संसाराला स्वर्ग बनविण्याची क्षमता महिलेमध्ये असा संदेश भगवान महावीर यांनी दिला”, असे पद्मसागर म्हणाले.

महात्मा गांधींच्या आई जैन होत्या – पद्मसागर

“भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास अंहिसेवर आधारित आहे. महात्मा गांधींना जैन गुरुंकडून अंहिसेची शिकवण मिळाली, त्यांच्या आई जैन होत्या. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करुन त्यांना मारण्यात आले. यावेळी ताराराणी या जैन राणीचा उदय झाला. महाराणी ताराबाई या ‘जैन’ होत्या आणि त्यांनी औरंगजेबाच्या अत्याचाराविरुद्ध लढा देऊन त्याला पराभूत केले. त्याचप्रमाणे, मेवाडच्या राणी कुरमा देवी यांनी कुतुबुद्दीन ऐबकचा पराभव करून त्याला भारतातून हाकलून लावले आणि भारतातील पहिल्या तोफेचा शोधही त्यांनीच लावला”, असे पद्मसागर म्हणाले.

भारत सरकारकडे तीन मागण्या

“जो धर्म मानवतेची शिकवण देत नाही आणि अत्याचार आणि हिंसेला उत्तेजन देतो, अशा धर्मावर बंदी घालावी. पुर्नजन्मावर संशोधन सुरु करावे आणि भारताचे तुकडे होऊ नयेत. तसेच, दोनपेक्षा अधिक आपत्य असणाऱ्यांना सुविधा दिल्या जाऊ नयेत एवढेच नव्हे तर त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा”, अशा मागण्या त्यांनी भारत सरकारकडे केल्या. भारतात राहणारा प्रत्येक हिंदू आहे, असेही पद्मसागर म्हणाले. तीन करोड विद्यार्थी अशा शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत जे कधीही आतंकवादी होऊ शकतात, मुंबईत अशा शाळा आहेत. आजकाल शाळा भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

इंडोनेशियात जैन मंडळ आणि आरएसएसची गुप्त मोहिम

“इंडोनेशियामध्ये भारत जैन मंडळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक गुप्त मोहिम राबवली. या मोहिमेच्या माध्यमातून इंडोनेशियामध्ये १० लाख मुस्लिम लोकांनी हिंदू आणि जैन धर्म स्वीकारला”, असा दावाही पद्मसागर यांनी केला. “धर्माशिवाय धन, आरोग्य किंवा यश प्राप्त होत नाही. नम्रता आणि धर्माचे पालन केल्यानेच माणसाची प्रगती होते. कितीही व्यस्त असले तरी मानवाने आपल्या आयुष्यात धर्माला प्रथम स्थान दिले पाहिजे, कारण धर्म गेल्यावर सर्व काही नष्ट होते”, असेही पद्मसागर म्हणाले.

मराठीची रचना जैन आचार्यांनी केली – पद्मसागर

“मराठी भाषेची रचना जैन आचार्यांनी केली, यासाठी आम्हाला धन्यवाद द्यायला कोणी येत नाही. भारतात सच्चे मराठी कोण असतील तर ते जैन आहेत. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये जैनांनी मराठी भाषेची रचना केल्याचा उल्लेख आहे”, असे पद्मसागर म्हणाले.

संभाजी छत्रपतींनी सुनावले खडेबोल

माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना विनाकारण वाद निर्माण करू नये, अशा शब्दात मुनींना सुनावले. महान व्यक्तिमत्त्वांबाबत खोटे दावे करणे हे अत्यंत अशोभनीय असल्याचेही त्यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असलेल्या स्वराज्यरक्षिका करवीर संस्थापिका छत्रपती ताराबाई महाराणीसाहेब यांच्याबाबत एका मुनींनी केलेले वक्तव्य धादांत तथ्यहीन व अतिशय बेजाबदारपणाचे आहे. धार्मिक गुरुपदावर असणाऱ्या व्यक्तींनी महान व्यक्तिमत्त्वांबाबत खोटे दावे करणे हे अत्यंत अशोभनीय आहे. शांतताप्रिय असणाऱ्या समाजाच्या या मुनींनी विनाकारण वाद निर्माण करू नयेत”, असे संभाजी छत्रपतींनी म्हटले आहे.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांनी सांगितला ताराराणींचा इतिहास

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी देखील याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या, राजाराम महाराज यांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा होत्या. त्यामुळे त्या कोणत्या कुळातील आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ताराराणी मराठा होत्या याबाबत कोणाचंही दुमत असण्याचे कारण नाही. याबाबत शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असावी असं वाटणं गैर नाही. मात्र इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असे वक्तव्य करू नये”, असे इंद्रजीत सावंत म्हणाले. राजाराम महाराजांच्या निधनानंतर सात वर्षे त्यांनी औरंगजेबविरुद्ध लढा दिला. आणि त्याला इथंच गाडला. त्यामुळे महापराक्रमी ताराराणी यांच्याबाबत अशी विधाने त्यांच्या पराक्रमाला बाधा आणणारे ठरु शकते, असे मत इंद्रजीत सावंत मांडले.

संजय राऊतांनी व्यक्त केला संताप

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी “महाराणी ताराराणी जैन होत्या”, असे वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वादंग निर्माण झाला. यावरुन शिवसेना नेते (उबाठा) संजय राऊत यांनी कठोर शब्दात निषेध नोंदवला. शिवरायांचे राज्य इतके नपुसंक का झाले आहे? असा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. “काय सुरू आहे महाराष्ट्रात? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर सांगतात की महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! औरंगजेबाशी झुंज देणाऱ्या वीरांगना ताराराणींचे धर्मांतर करण्याचा अधिकार याना दिला कोणी?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “ताराराणी शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकल्या सुनबाई म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या! ताराराणीचे असे धर्मांतर सुरू असताना मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प बसले आहेत, का? कशासाठी? उद्या हे सांगतील आमच्या मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले १०६ हुतात्मे सुद्धा जैन होते! यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टाळ्या वाजवतील!”, असे राऊत यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले.