Jain Muni Nayan Padmasagar Controversy: जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने वादंग निर्माण झाला आहे. “महाराणी ताराराणी जैन होत्या”, असे वक्तव्य केल्याने पद्मसागर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महावीर जयंतीच्या निमित्ताने आयोजित जैन समूदायाच्या कार्यक्रमात बोलताना मंगळवारी त्यांनी हे वक्तव्य केले. पद्मसागर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले असून, इतिहास अभ्यासक आणि राजकीय नेत्यांनी पद्मसागर यांना खडेबोल सुनावले आहेत.
जैन मुनी नक्की काय म्हणाले?
“औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे पूत्र संभाजी महाराजांना पकडून त्यांचे हाल केले. लोकांना गरम तेलात टाकण्यात आले. अशा काळात एक जैन महिला राणीचा उदय झाला. महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाचा पराभव करण्याचा निर्धार केला. औरंगजेबाचा पराभव करण्याचे काम एका जैन राणीने केले. हा जैन महिलांचा इतिहास आहे”, असे जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
विनाकारण वाद निर्माण करू नयेत – संभाजी छत्रपती
माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना विनाकारण वाद निर्माण करू नये, अशा शब्दात मुनींना सुनावले. महान व्यक्तिमत्त्वांबाबत खोटे दावे करणे हे अत्यंत अशोभनीय असल्याचेही त्यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असलेल्या स्वराज्यरक्षिका करवीर संस्थापिका छत्रपती ताराबाई महाराणीसाहेब यांच्याबाबत एका मुनींनी केलेले वक्तव्य धादांत तथ्यहीन व अतिशय बेजाबदारपणाचे आहे. धार्मिक गुरुपदावर असणाऱ्या व्यक्तींनी महान व्यक्तिमत्त्वांबाबत खोटे दावे करणे हे अत्यंत अशोभनीय आहे. शांतताप्रिय असणाऱ्या समाजाच्या या मुनींनी विनाकारण वाद निर्माण करू नयेत”, असे संभाजी छत्रपतींनी म्हटले आहे.
इंद्रजीत सावंत काय म्हणाले?
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी देखील याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा होत्या. त्यामुळे त्या कोणत्या कुळातील आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही. महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असावी असं वाटणं गैर नाही. मात्र इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असे वक्तव्य करू नये”, असे इंद्रजीत सावंत म्हणाले.
मोदी आल्यानंतर खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला – जैन मुनी
जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले. मोदी आल्यानंतर खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला, असेही वक्तव्य पद्मसागर यांनी केले. मोदींनी राम मंदिर निर्माण करुन हिंदुना मोठी भेट दिली. वयाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा ते काम करत आहेत, असे पद्मसागर म्हणाले.
