लोणावळा येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खुनाचा निषेध करण्यासाठी शहरातील विविध जैन संघटनांच्या वतीने आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच सायंकाळी कापड बाजारातील भिंगारवाला चौकात मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उद्या, बुधवारी व परवाही संघटना आंदोलन करणार आहेत.
ऑल इंडिया जैन सोशल फेडरेशन, जैन ओसवाल युवक संघ, बडीसाजन ओसवाल संघ, आनंदतीर्थ युवा परिषद, जय आनंद महावीर युवक मंडळ, ख्रिस्तगल्ली संगम तरुण मंडळ, जय आनंद ग्रुप, मारवाडी युवा मंच, जैन सोशल फेडरेशन, महावीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी होते.
धार्मिक परीक्षा बोर्डमधून निघालेला मोर्चा शहरातील प्रमुख रस्त्यवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे झालेल्या सभेत अभिजित लुणिया, शैलेश मुनोत, अजय बोरा आदींची भाषणे झाली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. लोणावळा येथील घटना अमानवीय आहे, परंतु घटनास्थळाचा मालकच प्रशासनावर दडपण आणत आहे, पोलीसही केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, गृहराज्यमंत्रीही या प्रकरणावर मौन बाळगून आहेत, त्यामुळे गुन्हेगारांना त्वरित अटक करावी, रिसॉर्टच्या मालकांवर व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, गुन्ह्य़ाचा तपास सीबीआयमार्फत करावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
समीर बोर, राजेश गुगळे, कमलेश भंडारी, धनेश कोठारी, सचीन डुंगरवाल, सुमित वर्मा, किशोर बोरा आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सायंकाळी कापड बाजारातील भिंगारवाला चौकात श्रद्धांजली सभा झाली, तेथे उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहिली, उद्या, बुधवारी प्रोफेसर कॉलनी चौकात, गुरुवारी दिल्ली गेट येथे श्रद्धांजली सभा होईल.