मुंबई  : जळगाव जिल्ह्यातील धामणदे (ता. मुक्ताईनगर) या समूह  ग्रामपंचायतीमध्ये वित्त आयोगाच्या निधीत मोठा गैरव्यवहार झाल्याची कबुली ग्रामविकास मंत्र्यांनी दिली. विकास कामांचे जिओ टॅगिंग न करताच, प्रत्यक्ष ठिकाण निश्चित नसताना कामे करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. या प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल आला आहे, सविस्तर चौकशी केली जाईल. चौकशी अंती या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

विधान परिषदेत ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे यांनी या बाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. खडसे उपस्थित नसल्याने शशिकांत शिंदे यांनी प्रश्न मांडला. या वेळी मंत्री गोरे यांनी गैरव्यवहार झाल्याची थेट कबुली दिली. विकास कामे करत असताना त्याचे जिओ टॅगिंग (भौगोलिक पत्ता) महत्त्वाचे आहे. मात्र २०२० ते २०२५ या कालावधीत करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि गैरव्यवहार झाला असल्याचे प्रथमिक अहवालात दिसून आले आहे.

या प्रकरणाची माहिती घेतली असता, तेथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदरची कामे पाहून आल्याचे सांगितले आहे. मात्र, ज्या कामाचे जिओ टॅगिंग झालेलेच नाही. प्रत्यक्ष ठिकाणांचा पत्ताच नाही तर मग ती कामे पाहिली कशी, असा असा सवाल खुद्द ग्रामविकास मंत्री गोरे यांनीच उपस्थित केला. या प्रश्नाची सखोल चौकशी केली जाईल. ग्रामविकास अधिकारी, सरपंच, गटविकास अधिकारी, उपअभियंता आदी प्रथमदर्शिनी दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यासह अन्य दोषींवरही कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा गोरे यांनी केली.

मंत्र्यांच्या उत्तरावर बोलताना सतेज पाटील यांनी ग्रामविकास मंत्र्यांनीच गैरव्यवहार झाल्याचे कबूल केले आहे. असे असताना कारवाईसाठी वाट कशाला पाहता ?  या प्रकरणात कोण – कोण दोषी आहे, त्यांची नावे सभागृहाला सांगावीत आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.

जळगावात नेमकं काय झालं बोजामाफ पुस्तिकेत कामांची नोंद आहे व काही ठिकाणी फोटो जोडलेले आहेत; मात्र कामाचे स्पष्ट लोकेशन नमूद केलेले नाही. काही ठिकाणी जिओ टॅगिंगचे फोटो नसून साधे फोटो जोडलेले आहेत, तर तीन ठिकाणी फोटोच उपलब्ध नाहीत. कामाचे लोकेशन नसताना अंदाजपत्रक तयार होणे आणि कामास मंजुरी मिळणे, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचेही मंत्री गोरे यांनी सभागृहाला सांगितले.