जळगाव : कृषी आणि औद्योगिक विकासाच्या जोरावर सातत्याने प्रगतीपथावर वाटचाल करणार्‍या जळगाव जिल्ह्याने अलीकडे ऊर्जा क्षेत्रातही मोठी भरारी घेतली आहे. दीपनगर प्रकल्पामुळे वीज निर्मिती क्षेत्रात जिल्हा राज्यात तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्यातही घरगुती तसेच लघुशक्ती, औद्योगिक, कृषी आणि इतर वीज जोडण्यांची संख्या सुमारे १० लाखांपेक्षा अधिक असलेल्या जिल्ह्याचा दरडोई वीज वापरही उत्तरोत्तर वाढत असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यातील ऊर्जाक्षेत्रात सातत्याने सकारात्मक प्रगती होत असल्याचे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन अहवालातून स्पष्ट झाले आहे. २०२४ मध्ये प्रकाशित अहवालानुसार, जिल्ह्यात घरगुती, लघुशक्ती, औद्योगिक, कृषी व इतर प्रकारच्या वीज जोडण्यांची एकूण संख्या ९.९४ लाख इतकी होती. याच कालावधीत जिल्ह्याचा दरडोई वीज वापर १८४८ किलोवॅट प्रतितास इतका नोंदविण्यात आला होता. २०२५ च्या अहवालात या दोन्ही निर्देशकांमध्ये वाढ होऊन वीज जोडण्या एकूण १० लाख ४३ हजारांवर, तर दरडोई वीज वापर प्रतितास १९०४ किलोवॅटपर्यंत पोहोचला. म्हणजेच, एका वर्षातच जोडण्यांमध्ये सुमारे ४९ हजारांची वाढ नोंदवण्यात आली.

वीज वापराच्या वाढीमागे जिल्ह्यातील शहरीकरणाचा वेग, औद्योगिक क्षेत्राचा विस्तार, कृषी क्षेत्रातील वीज वापरात झालेली वाढ तसेच घरगुती वापरातील वाढते विद्युतीकरण हे महत्त्वाचे घटक आहेत. दरडोई वीज वापरात वाढ होणे हे आर्थिक प्रगतीचे द्योतक मानले जाते. ही वाढ जीवनमान उंचावण्याच्या दिशेने होत असलेल्या विकासाचे संकेत देत आहे.

‘दीपनगर’ची देदीप्यमान कामगिरी!

जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात दीपनगर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात सध्या ५०० मेगावॅट क्षमतेचे दोन, ६६० मेगावॅट क्षमतेचा एक आणि २१० मेगावॅट क्षमतेचा एक, असे एकूण चार संच पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. यामुळे दीपनगर प्रकल्पाची स्थापित वीज निर्मिती क्षमता सुमारे १८७० मेगावॅटपर्यंत पोहचली आहे. राज्यातील चंद्रपूरसह कोराडी येथील प्रमुख वीज निर्मिती केंद्रांनंतर दीपनगर प्रकल्पाचा वीज निर्मितीत मोठा वाटा राहिला आहे.

उद्योगांमुळे रोजगारनिर्मितीला चालना

जिल्ह्यात उद्योग आधार असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांची संख्या ६१२२ इतकी असून, त्यात १६७ कोटी ७४ लाखांची गुंतवणूक झाली आहे. त्यातून २१ हजार व्यक्तींना थेट रोजगार मिळाला आहे. याशिवाय, मुद्रा योजनेंतर्गत एक लाख आठ हजार ३३८, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून ७६९ आणि इतर महामंडळांमार्फत ६३ बेरोजगारांना उद्योग-व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे.