scorecardresearch

मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण; ‘कश्मीर फाइल्स’ पाहून बाहेर येताना मारहाण

धरणगाव शहरातील आयनॉक्स चित्रपटगृहाबाहेर करण्यात आली ही मारहाण

CM Uddhav Thackeray
जळगावमधील धरणगाव येथे घडला हा संपूर्ण प्रकार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्याच्या मुद्द्यावरुन जळगावमध्ये एका व्यक्तीला शिवसैनिकांनी मारहाण केल्याची घटना घडलीय. जळगाव जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमधील ही अशी दुसरी घटना आहे. ही व्यक्ती ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी गेली असता तिला या पोस्टसंदर्भात जाब विचारत चित्रपटगृहाच्या बाहेरच मारहाण करण्यात आली. हा संपूर्णप्रकार जिल्ह्यातील धरणगाव शहरात घडला.

समोर आलेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील हेमंत द्वितीये यांनी सोशल मीडियावरील जळगाव शहरातील एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या पोस्टमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली.

ही पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्यानंतर हेमंत द्वितीये शहरातील आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी आले होते. ते चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर आले तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्यावर पाळत ठेवत चित्रपटगृहासमोर त्यांना बेदम मारहाण केली. हेमंत द्वितीये यांच्याकडून शिवसैनिकांनी या पोस्टसंदर्भात माफी मागून घेतली. “माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली. त्याबद्दल मी माफी मागतो” असं म्हणत हेमंत यांनी माफी मागितल्यानंतर त्यांना शिवसैनिकांनी सोडून दिलं. यावेळी हेमंत यांच्यासोबत असणाऱ्या महिलेने, “त्यांच्याकडून चूक झालीय. पण यापुढे जेव्हा जेव्हा मला सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंविरोेधात अशी पोस्ट दिसेल तेव्हा मी त्या व्यक्तीचं नाव शिवसेना शाखेत आणून देईल, त्यावर तुम्ही काय करता बघू,” असं शिवसैनिकांना सांगितलं.

“ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्रीसाहेबांबद्दल अशी पोस्ट टाकेल त्याला असाच चौकामध्ये चोप दिला जाईल. अशी कोणतीही पोस्ट शिवसेनेच्याबद्दल आणि मुख्यमंत्रीसाहेबांबद्दल कोणी टाकू नये, हे याद राखावं,” असं यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितलं.

हेमंत यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांना मारहाण करण्यासाठी जमा झालेल्या शिवसैनिकांबरोबरच या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, महिला जिल्हाध्यक्षा शोभा चौधरी, सरीता माळी-कोल्हे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jalgaon man beaten by shivsena people for post against maharashtra cm uddhav thackeray scsg

ताज्या बातम्या