जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये पोलिसांनी गुंडगिरीला आळा घालण्यासाठी गुंडांची धिंड काढल्याची घटना समोर आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दरोडे, हत्या, अवैध धंदे, फसवणूक, काळा बाजार अशा अनेक प्रकारचे गुन्हे वाढले होते. या वाढलेल्या गुन्हेगारीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन दिले होते.
पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी या वाढत्या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेतली. यानंतर राहुल खताळ यांनी काही दिवसांपूर्वी घडलेल्या माजी सैनिकांच्या खुंनाच्या आरोपींना पकडून त्यांची कुऱ्हा परिसरात धिंड काढली. राहुल खताळ यांनी यावेळी तेथील जनतेशी संवाद साधत कोणालाही सोडणार नाही, बदमाशांना ठेचल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. चांगल्या लोकांच्या केसाला धक्का लागणार नाही, पण कोणत्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेणार नाही असंही स्पष्ट केलं. सामान्यांकडून पोलिसांनी गुंडांविरोधात सुरु केलेल्या या कारवाईचं कौतुक केलं जात आहे.