सोलापूर: महापालिका प्रशासनाची वेळकाढूपणा आणि विकासकाची मनमानी यांमुळे सोलापूरातील हद्दवाढ भाग असलेल्या जुळे सोलापूर परिसरातील ‘गणेश बिल्डर’ गृहप्रकल्पातील रहिवाशांचा रस्त्याचा प्रश्न चिघळला आहे. आश्वासनांची पूर्तता न करता उलट खाजगी व्यक्तीकडून रस्त्यावरच खोदकाम करण्यात आल्याने नागरिकांची वाट बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त रहिवाशांच्या बाजूने मैदानात उतरत खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनाच्या विरोधात थेट रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. रस्त्याचा प्रश्न निकाली काढेपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
निवडणूक बहिष्काराचे हत्यार अन् फोल आश्वासन..
या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा, विशेषतः रस्त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता; मात्र प्रशासकीय मध्यस्थीनंतर हे पाऊल मागे घेण्यात आले. त्यानंतर जानेवारी महिन्यात पार पडलेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान संतप्त झालेल्या २०० हून अधिक मतदारांनी प्रत्यक्षात मतदानावर बहिष्कार टाकत प्रशासनाचा निषेध नोंदवला होता. या आंदोलनानंतर महापालिकेच्या उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले आणि दुपारनंतर नागरिकांनी बहिष्कार मागे घेतला होता.
प्रशासनाची टोलवाटोलवी आणि रस्ता गायब
निवडणूक संपल्यानंतर नागरिकांनी सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा केला; मात्र प्रशासनाकडून केवळ टोलवाटोलवी सुरू राहिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका खाजगी व्यक्तीने त्या परिसरातील रस्त्यावरच थेट खोदकाम केल्याने रहिवाशांची ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे. “एकीकडे महसूल विभागाकडून शेत-शिवारांना रस्ते दिल्याचे दावे केले जातात, मग नागरी वस्तीतील करदात्या रहिवाशांना हक्काचा रस्ता का मिळत नाही?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांचे आंदोलन…
येथील रहिवाशांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महापालिकेच्या प्रवेशद्वारात निषेध आंदोलन केले होते. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांचा विधानसभा मतदारसंघ असून येथील तिन्ही नगरसेवक देखील भाजपचे आहेत. रहिवाशांच्या या व्यथा समजताच काँग्रेसच्या खासदार शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. “नागरिकांनी कष्टाच्या पैशातून घरे घेतली आहेत. बिल्डरची मनमानी आणि प्रशासकीय निष्क्रियता आता सहन केली जाणार नाही,” असे ठणकावले. रस्त्याच्या प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचे महापालिकातर्फे सांगण्यात आले. मग, जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तरबिल्डरने तो रस्ता जेसबीद्वारे खोदला का, त्या कोणी परवागन दिली, महापालिकेची यंत्रणा गप्प का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गर्दी वाढत असल्याने पोलिसाचा फौजफाटा आंदोलनस्थळी दाखल झाला आहे.
